गाय वासराची पूजा करून 'वसुबारस' साजरी; दीपावलीला आजपासून सुरुवात - कोरोनाच्या संकटाच्या काळात दिवाळी
कोरोना संकटाच्या काळात दिवाळीचा सण साधेपणाने परंतु पारंपरिक पध्दतीने साजरा होत असून आज कृषी संस्कृतीशी नाते सांगणारी वसुबारस आहे. पशुधना प्रती कृतज्ञता व्यक्त करत आजच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करून हा सण साजरा होत असतो.
राजगुरुनगर (पुणे) - दीपावली सणावर कोरोना महामारीच्या संकटाचे सावट आहे. नेहमीप्रमाणे साजरी होणारी दिवाळी यंदा साजरी होत नाही. मात्र, हिंदू धर्माच्या परंपरेनुसार दीपावलीचा सण पुण्याच्या ग्रामीण भागात साधेपणाने साजरा होत असून आज कृषी संस्कृतीशी नाते सांगणारी वसुबारस आहे. पशुधना प्रती कृतज्ञता व्यक्त करत आजच्या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा करून हा सण साजरा होत असतो.
पुरणपोळीचा नैवेद्य देऊन गो मातेची पूजा...
दीपावलीची सुरुवात वसुबारसेचा सण साजरा करून होते. आज सकाळी राजगुरुनगर येथील अतुल सांडभोर या शेतकऱ्याने गाई वासरांना आंघोळ घालत पशुधनाला ओवाळणी करून पुरणपोळीचा नैवेद्य दिला. वसुबारस साजरी करत असताना शेतकऱ्याचे कृषीधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गाई वासरांना मुलाबाळांप्रमाणे संभाळून, त्यांना आरोग्य व सुख लाभावे यासाठी ही पूजा करण्यात आली.
कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी गो मातेकडे शेतकऱ्याची प्रार्थना...
भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानली जाते. या दिवशी गाय व तिच्या वासराची पूजा शेतकरी मनोभावे करतो. आज वसुबारसेला यांचे पूजन करत असताना संपूर्ण जगावर आलेले कोरोना महामारीचे संकट लवकर दूर होईल, अशी प्रार्थना यावेळी शेतकरी करत होते.
राज्याभरातील बाजारपेठांमध्ये पुन्हा चैतन्य
गेल्या आठ महीन्यांपासून कोरोना संकटामुळे राज्यातील बाजारपेठेला मरगळ आली होती. मात्र, आता अटोक्यात येणारा कोरोना संसर्ग, दुसरीकडे शासनाने सुरु केलेला अनलॉक यामुळे मरगळ झटकून शहरांपासून गावोगावच्या बाजारपेठ दिवाळीच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत.
मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्याच्या बाजारपेठेत मंदीचे सावट होते. यंदा परतीच्या पावसाने अनेक ठीकाणी फटका दिल्याने शेतीमालाचे नुकसान होवून शेतकरी संकटात सापडला. अशा या दुहेरी संकटामुळे बाजारपेठेतील उलाढाल थांबल्याची परिस्थिती झाली होती. मात्र, विजयादशमी अर्थात दसऱ्यापासून नागरिकांच्या खरेदीच्या उत्साहामुळे बाजारपेठेत देखील चैतन्य पसरले आहे.
खरेदी व्यवहार वाढले
करोनाच्या लॉकडाउननंतर खुल्या झालेल्या वाहन बाजारात देखील आता उलाढाल वाढली आहे. लॉकडाउननंतर अनेकांनी वाहन खरेदी केली. काही जण मुहूर्ताच्या खरेदीसाठी थांबले आहेत. राज्यभरात दिवाळीच्या मुहुर्तावर दुचाकी व चारचाकी वाहनांची चांगली बुकींग झाली आहे. येत्या काही दिवसात यात आणखी वाढ होणार आहे.
राज्यातील प्रापर्टी सेक्टरवर देखील करोना संकटाने चांगलाच विपरीत परिणाम केला होता. मात्र, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रापर्टी सेक्टरमध्ये देखील काहीसा उत्साह आला आहे. आगामी दिवाळीच्या मुहुर्तावर देखील अनेक बुकींग होण्याची अपेक्षा आहे.
दिवाळीच्या सणाच्या अनुषंगाने पणत्या, दिवे, आकाशकंदील विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. या दुकानांवर ग्राहकांची वस्तू खरेदीसाठी गर्दी होत आहे. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव... त्यामुळे दिवाळीसाठी दिवे, पणत्या विविध आकारातील व रंगसंगतीतील आकाशकंदील खरेदीसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. घराची शोभा वाढवण्यासाठी तोरण, मातीच्या झुंबरची खरेदी देखील मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.
दिवाळीचे चार दिवस
वसुबारस:- निज अश्विन कृष्ण द्वादशी - गुरुवार-12 नोव्हेंबर
धनत्रयोदशी :- निज आश्विन कृष्ण त्रयोदशी - शुक्रवार-13 नोव्हेंबर
नरक चतुर्दशी :- निज अश्विन कृष्ण चतुर्दशी -शनिवार-14 नोव्हेंबर
लक्ष्मीपूजन :- निज अश्विन अमावस्या - शनिवार-14 नोव्हेंबर
बाल प्रतिपदा व पाडवा :- कार्तिक शुद्ध प्रतिपदा - सोमवार-16 नोव्हेंबर
भाऊबीज:- कार्तिक शुद्ध द्वितीया- सोमवार-16 नोव्हेंबर