पुणे - मुलाने आंतरजातीय लग्न केले. त्यामुळे एका कुटुंबावर बहिष्कार घातल्याचे सांगणाऱ्या जातपंचायतीतील 5 जणांविरोधात पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात ( Dattawadi Police Station Pune ) गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित जातपंचायतीचा कार्यक्रम अरणेश्वर गवळीवाडा येथील मुक्तांगण शाळेच्या हॉलमध्ये घडला होता.
जातपंचायतीतील 5 जणांवर पुण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र समाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण कायद्यांतर्गत अर्जुन रामचंद्र जानगवळी, हरीभाऊ हिरणवाळे, चंद्रकांत उर्फ बाळू औरंगे व त्यांचे इतर दोन साथीदार यांच्याविरोधात रामचंद्र भाऊसाहेब पंगुडवाले ( वय 69 वर्षे, रा. गवळीवाडा, खडकी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराचा मुलगा धीरज पंगुडवाले याने दिलेल्या माहितीनुसार, धीरज पंगुडवाले आणि त्यांचे वडील रामचंद्र भाऊसाहेब पंगुडवाले नातेवाईक संजय नायकू यांच्या मुलाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले होते. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या समाजातील पंचानी रामचंद्र यांना तुमच्या मुलाने जातीच्या बाहेर लग्न केले आहे. त्यामुळे तुम्ही आता आमच्यात येऊ शकत नाही, असे म्हणाले. तसेच आयोजकांना तुम्ही यांना का बोलावले आहे, हे जातीतून बहिष्कृत केलेले आहेत, असे म्हणत तिथून निघून जाण्यास सांगण्यात आले. अशा पद्धतीने विविध कारणे देऊन आम्हाला त्रास दिला जात आहे, असे म्हणत पंचावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी धीरज पंगुडवाले यांनी केली आहे.
हे ही वाचा - Pune Corona Update : पुण्यात 100 कोरोना चाचण्यामागे सापडले 'इतके' बाधित रुग्ण, वाचा सविस्तर...