पुणे - उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने 'कॅन्डल मार्च'चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिवसेना, काँग्रेस, आप, लोकायत यांसारख्या पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाल महाल ते मंडई दरम्यान हा मार्च काढण्यात आला. नराधमांना फाशी देण्यात यावी तसेच पीडितेच्या कुटुंबीयांना संरक्षण मिळण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. यासह पीडितेचे अंत्यसंस्कार कुटुंबीयांच्या परस्पर उरकणाऱ्या पोलिसांवर व तपास अधिका-यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यासाठी पिंपरी चिंचवडसह पुणे शहरात देखील रविवारी (11 ऑक्टोबर) कॅन्डल मार्च काढण्यात आला होता.
या कँडल मार्चमध्ये माजी आमदार मोहन जोशी, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष स्वाती पोकळे शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह राजकीय पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
पिंपरी मिलींदनगर येथील महर्षी वाल्मिकी मंदिरात रिपब्लिकन युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष सुवर्णा डंबाळे यांच्या हस्ते मशाल प्रज्ज्वलीत केल्यानंतर या रॅलीचा समारोप शगून चौकात झाला. कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे, माजी नगरसेवक अरुण टाक, धनराज बिर्दा, आरपीआयचे शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, रिपब्लिकन युवा मोर्चा नेते राहुल डंबाळे यांनी संयोजन केलेल्या या निषेध सभेत सर्वपक्षीय पदाधिका-यांनी व प्रमुख समाज बांधवांनी योगी सरकारच्या विरोधात निषेध नोंदवला. यावेळी माजी आमदार विलास लांडे पाटील, ॲड. गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, आदींसह अनेक महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.
'सोशल डिस्टसिंग'चा फज्जा
मशाल महारॅलीत मोठ्या प्रमाणावर सर्व पक्षीय नेते, स्थानिक नगरसेवक, कार्यकर्ते आणि अन्य नागरिक सहभागी झाले होते. परंतु, शेकडो नागरिक एकत्रित आल्याने कोरोनाचा पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली झाल्याचं पाहायला मिळालं. मशाल रॅलीत सहभागी झालेल्या व्यक्तींची संख्या जास्त असल्याने सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला.