पुणे : प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचं शनिवारी निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. राहुल बजाज हे 1968 मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले होते. आज त्यांचे दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी ४.३० वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमित अंत्यसंस्कार होणार आहेत.
यासंदर्भात माहिती देताना रुबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. ग्रॅंट म्हणाले, की गेल्या महिन्याभरापासून त्यांची प्रकृती खालावत होती. आज दुपारी ३.३० च्या सुमारास त्यांचे निधन झाले. आज दिवसभर त्यांचा मृतदेह रुबी हॉल क्लिनिकमध्ये ठेवले जाईल. उद्या सकाळी त्यांच्या कुटुंबीयांना मृतदेह दिला जाईल. त्यांचे निधन कार्डियाक आणि लंग्ज प्रॉब्लेममुळे झाले आहे. वय जास्त असल्याने त्यांना या समस्या भेडसावत होत्या.
बजाज उद्दोग समूहाला मोठे करण्यात महत्त्वाचे योगदान -
प्रसिद्ध उद्योजक आणि बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे निधन झाले आहे. पुण्यात त्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 साली झाला होता. त्यांनी १९६८ मध्ये बजाज समूहाचे कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. बजाज उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे.
'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित -
2001 मध्ये राहुल बजाज यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. तसेच त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून 'एमबीए'चेही शिक्षण पूर्ण केले होते.
बजाज ऑटोच्या यशात मोलाचा वाटा -
राहुल बजाज सन १९६८ मध्ये बजाज ऑटोचे सीईओ झाले. यानंतर ३० व्या वर्षी जेव्हा राहुल बजाज यांनी ‘बजाज ऑटो लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला, तेव्हा हे पद मिळविणारे ते सर्वात तरुण भारतीय असल्याचे सांगितले जाते. यानंतर बजाजने एका निरंकुश पद्धतीने उत्पादन केले आणि स्वत:ला देशातील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक बनविण्यात यश मिळविले. वर्ष १९६५ मध्ये ३ कोटींच्या उलाढालीवरून सन २००८ मध्ये बजाजने सुमारे १० हजार कोटींची उलाढाल गाठली.
दिला होता राजीनामा -
गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती. बजाज ऑटोला आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांना महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा होता. राहुल बजाज यांच्यानंतर ६७ वर्षीय नीरज बजाज यांच्याकडे बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती.