पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. शहरातील दापोडी येथील पुलावर अचानक पीएमपीएलच्या बसने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच 30 प्रवाशांना बाहेर जाण्यास सांगितले. यामुळे या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही घटना बुधवारी (दि. 27) सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला. त्यानंतर बस बंद पडली, दरम्यान चालक लक्षण हजारे यांनी तातडीने प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर बसने पेट घेतला आणि आगिने रौद्ररुप धारण केले. घटनेची माहिती मिळताच राहटणी आणि पिंपरी अग्निशमन दलाच्या वाहनांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. बसचा पुढील भाग जळून खाक झाला आहे, अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली होती.
हे ही वाचा - दिवाळीचे साहित्य बाजारात दाखल,नागरिकांची गर्दी वाढली;पहा ईटीव्ही भारत'वर खास फोटो