पुणे - गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना निर्बंधामध्ये आता कुठे शिथिलता मिळण्यास सुरुवात झाली होती. अशातच ओमायक्रॉन संकटाने पुन्हा लॉकडाउन लागतो की काय या भीतीने नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे ज्याची लग्नाची तारीख जवळ अली आहे. आणि त्यासाठी जय्यत तयारी केली आहे. अशा वधू/वर पित्याचा जीव लॉकडाऊनच्या भीतीने ( Omicron Crisis On Marriage ) भांड्यात पडला आहे.
वधू-वर पक्षांत धास्ती -
सण-उत्सव, कौटुंबीक सोहळे, लग्न समारंभ यांना नुकताच कुठे वेग येत असताना हे ओमायक्रॉनचे नवे संकट उभे ठाकले आहे. मुहूर्तामुळे अनेकांनी मंगल कार्यालये, हॉल बुक केले अन् लग्न खरेदी उरकली आहे. मात्र, पुन्हा अनिश्चिततेची टांगती तलवार आल्याने वधू-वर पक्षांत धास्ती निर्माण झाली आहे. ऐन तोंडावर आलेले लग्न कसे पार पडणार याची चिंता त्यांना सतावत आहे.
लग्न घरात चिंतेच वातावरण -
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यात्रा, उत्सव, रद्द करून लग्न समारंभावर प्रशासनाने निर्बंध लागू केले होते. पन्नास लोकांच्या उपस्थितीतच लग्न पार पाडण्याची परवानगी मिळाल्याने वधू-वर पक्षातील मंडळींनी अगदी साध्या पद्धतीनेच म्हणजे आई-वडील आणि जवळचे ठरावीक नातेवाईक यांच्या उपस्थितीतच विवाह सोहळे पार पाडले, तर काहींनी कोरोना संपल्यानंतर मोठ्या थाटामाटात लग्न करायचे म्हणून तारखाही पुढे ढकलल्या होत्या. आता पुन्हा तशीच वेळ येते का याची चिंता लग्न घरात सतावू लागली आहे.
कार्यालय, मंडप व्यावसायिकही धास्तावले -
आता कुठे व्यवसाय पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली होती. लग्न समारंभाचे बुकिंग सुरू झाले होते. डिसेंबर आणि फेब्रुवारी महिन्यांत कार्यालय आणि मंडपासाठी जवळपास ३० ते ३५ तारखांचे बुकिंग झाले होते. मात्र, ओमायक्रॉनच्या धसक्याने दोन दिवसांपासून निम्म्या बुकिंग कॅन्सल झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा आर्थिक संकट ओढावणार असे कार्यालय व्यावसायिक रवींद्र कदम आणि मंडप व्यावसायिक उदय शेळके यांनी सांगितले.
ओमायक्रॉनमुळे शुभमुहूर्ताला आडकाठीतर येणार?
माझ्या मुलीचे लग्न अवघ्या काही दिवसांवर आले असून कार्यालय बुक केले आहे. परंतु ओमायक्रॉनमुळे शुभमुहूर्ताला आडकाठीतर येणार नाही ना अशी भिती निर्माण झाली आहे. असे वधुपिता मोहन कुलकर्णी म्हणाले.
हेही वाचा - 'हा' योग आरोग्यासह रोमांस देखील वाढवू शकतो, वाचा...