पुणे - पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल 52 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. तसेच शेवटचा विधी करण्यासाठी कुटुंबातील एका सदस्याचा बळी द्यावा लागेल असे सांगितले. या मागणीनंतर घाबरलेल्या व्यक्तीने पुणे पोलिसात धाव घेत एका मांत्रिकाविरोधात तक्रार दिली. त्यानंतर किसन आसाराम पवार या मांत्रिकाला अटक केली आहे. याप्रकरणी पुण्यातील एका 40 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अघोरी व दुष्कर्म प्रथा आणि काळी जादू अधिनियमन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा - 'सायकल गर्ल'च्या शिक्षणाचा खर्च काँग्रेस उचलणार; प्रियंका गांधींनी ज्योतीशी फोनवरून साधला संवाद
काय आहे प्रकार?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉमन मित्रांच्या माध्यमातून तक्रारदार आणि आरोपी मांत्रिकाची ओळख झाली होती. आरोपीने तक्रारदाराला विश्वासात घेऊन स्वतःमध्ये दैवी शक्ती असून, पैशाचा पाऊस पाडून दाखवतो असे सांगितले. यासाठी छोटीसी पूजा करावी लागेल आणि पूजेसाठी काही पैसे द्यावे लागतील असे त्याने तक्रारदाराला सांगितले. तक्रारदारानेही त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला वेळोवेळी असे मिळून 52 लाख एक हजार रुपये दिले. दरम्यान, इतके पैसे देऊनही पैशाच्या पाऊस न पडल्याने तक्रारदाराने संबंधित मांत्रिकाला पैसे देणे बंद केले. त्यानंतर आरोपी मांत्रिकाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि शेवटचा एक विधी करायचा असून, त्यासाठी तुमच्या कुटुंबातील एका सदस्याचा नरबळी द्यावा लागेल असे सांगितले होते. त्यानंतर घाबरलेल्या तक्रारदाराने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली होती.
आरोपीला जालन्यातून अटक
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केली आणि आरोपीला पकडण्यासाठी जालना येथे काही पथके रवाना केली. आरोपीला रंगेहात पकडण्यासाठी पोलिसांनी बनावट व्यक्तीला त्याच्याकडे पाठवले आणि रंगेहात पकडले. पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला असता सर्वत्र विखुरलेल्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्या. आरोपीने अशाप्रकारे आणखी काही व्यक्तींची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. पुणे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा - पोलीस निरीक्षकाचा महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचार