पुणे - भारतीय सीमेवर चीनने केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. चीनने केलेल्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात भाजप युवा मोर्चाच्यावतीने निषेध करत आंदोलन करण्यात आले. कोथरूड परिसरातील महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी चिनी वस्तूंची तोडफोड करीत होळीही करण्यात आली.
यावेळी बोलताना भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ म्हणाले की, चीनने भ्याडपणे केलेल्या हल्ल्यात भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. चीनच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले आहे. चीनला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले आहेच. पण एक भारतीय नागरिक म्हणून भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कोथरूड परिसरातील नागरिकांनी आजपासून चिनी वस्तू न वापरण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. कोथरूड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष पुनीत जोशी म्हणाले की, भारताच्या वीर जवानांनी चीनच्या सैनिकांना मारता मारता वीरगती पत्करली. या वीर सैनिकांनी 40 हून अधिक चिनी सैनिकांना मारले. भारतीय सैनिकांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. कोथरूड मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते यापुढे चिनी वस्तू, चिनी अॅप वापरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.