पुणे - शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी, कोथरूड मतदारसंघातल्या रुग्णालयाला आमदार निधीतून 1 कोटी रुपये दिले आहेत.
उर्वरित 3 कोटी निधी देखील खर्च करणार
आमदारांना असलेल्या स्थानिक विकास निधीतून हा निधी देण्यात आला आहे. हे एक कोटी रुपये, कोथरूड मतदारसंघातील बाणेर येथील रुग्णालयात विविध उपकारणे खरेदी करण्यासाठी देण्यात आले आहेत. पाटील यांनी पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र लिहून हा निधी संबंधित कामासाठी खर्च करण्याबाबत कळवले. कोविड रुग्णांच्या उपचारासाठी याचा लाभ होईल.
या निधीसह उर्वरित 3 कोटींचा विकास निधी देखील आवश्यकतेनुसार कोविड संसर्गावरील विविध उपाययोजनासाठी खर्च करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. नेहमीच्या विकासकामांना फाटा देऊन यावेळेसचा निधी हा पूर्णपणे आरोग्यावर खर्च करणार असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
खरेदी प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करावी
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार राज्य सरकारने सर्व आमदारांना कोविडसाठी निधी वितरित केला. त्या दिलेल्या निधीतून बाणेर येथील रुग्णालयात 10 व्हेंटिलेटर, 10 मॉनिटर आणि अनुषंगिक साहित्य, 2 एक्स रे मशीन प्रिंटर व व्युहर सह ( रेडिओग्राफी तंत्रज्ञान ) इ.सी.जी मशीन, पी ए व सीसीटीव्ही व अन्य रुग्णोपयोगी साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. खरेदी प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करावी, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे.