पुणे - निवडणुका जवळ आल्या की राजकीय पैलवान सर्वांना आठवतो आणि त्या त्या पैलवानांबद्दल राजकारण सुरू होते. महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ला होणार असून आतापासूनच राजकरण तापू लागले आहे. आमच्या विरोधात कितीही पैलवान एकत्र आले, तरी जनता आमच्या बरोबर आहे. महापालिका निवडणुकीत तीन तीन पैलवान एकत्र आले तरी पुण्याची महापालिका आम्हीच जिंकू, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पुणे महानगरपालिका व युवा स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नगरसेवक दीपक पोटे यांच्या प्रयत्नातून पेहेलवान जिमचे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तसेच खासदार गिरिश बापट यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
'सध्या न मानण्याचा नवा ट्रेंड सुरू'
कृषी कायद्यांवर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने तिन्ही कृषी कायद्यांना स्थगिती दिली. त्याचबरोबर शेतकरी आणि सरकार यांच्यात तोडगा काढण्यासाठी चार सदस्यांची समिती नियुक्त केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शेतकरी घरी परततील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका कायम ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या देशात ज्या घटनात्मक संस्था आहेत, त्यांच्याकडून न मानण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. केंद्र सरकारने एवढे स्पष्ट बहुमत असतानाही सुप्रीम कोर्ट सुप्रीम असे मानून सुप्रीम कोर्टाचा आदेश मान्य केला. असा हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आंदोलकांनी मान्य केला पाहिजे, असे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले.
'मराठा आरक्षण मुद्द्यावर आता केंद्राचा काहीच रोल नाही'
25 जानेवारीला मराठा आरक्षणाविषयी निकाल येणारे मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर आता केंद्राचा काहीच रोल नाही हे राज्य सरकारच्याच हातात आहे. १० टक्के आर्थिक निकषावर आरक्षण देण्याव्यतिरिक्त केंद्राचा आरक्षणामध्ये काहीच रोल नाही. हे राज्यकर्त्यांना माहीत असूनही केंद्राकडे ढकलण्याचे प्रयत्न आहेत, असे ते म्हणाले.