पुणे - शिवसेनेला खरे बोलले की झोंबते. अमित शाह हे खरे बोलले म्हणून त्यांना फारच झोंबले. मात्र, शाह यांनी शिवसेना संपविण्याची भाषा केली नाही. शिवसेना आणि संजय राऊत यांना नेहमी पराचा कावळा करण्याची सवयच आहे, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. ते चिंचवड येथे पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले गिरीश प्रभुणे यांनी भेट घेण्यासाठी आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
'शाह यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा केली नाही'
चंद्रकांत पाटील म्हणाले, की शिवसेनेला खरे बोलले की झोंबते. शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली की आजपर्यंत शिवसेनेला कोणी संपवू शकलेले नाही. तर, अमित शाह यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा केली नाही, असे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. पुढे ते म्हणाले, की अमित शाह असे म्हणाले, की 14-15 महिने सरकार आल्यानंतर ज्या प्रकाराने व्यवहार चालला आहे, तो आम्ही पाच वर्षे आमच्याकडे राज्य असताना केला असता तर शिवसेना संपली असती, ते खरे आहे, असे ते म्हणाले.
'आम्ही कधी खुन्नसने वागलो नाही'
आम्ही कधी खुन्नसने वागलो नाहीत. जुने हिशोब काढून बसण्याचे कारण नाही, असा तो मुद्दा होता. शिवसेना आणि संजय राऊत यांना पराचा कावळा करण्याची सवय आहे. त्यानुसार त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यांच्या म्हणण्याला आम्ही काही घाबरत नाहीत. आम्हाला जे म्हणायचे ते छातीठोकपणे म्हणतो. त्यात आमची संस्कृती नाही, की समोरच्या व्यक्तीला टाकून बोलणे, लागून बोलणे, त्यामुळे त्याचे भांडवल करण्याचे कारण नाही.
'17पैकी 6 नगरसेवक गेले; जाणे-येणे होतच असते'
वैभववाडी येथे 17 पैकी 17 नगरसेवक हे भाजपाचे आहेत. पैकी सहा गेले. जाणे-येणे त्या-त्या कारणाने होत असते. अमित शाह यांच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार येईल, अन् वैभववाडीचे सहा नगरसेवक गेले. या दोन्हीचा संबंध नाही. अमित शाह यांच्या पायगुणाने सरकार येणार असेल ते येईलच, असेही ते म्हणाले.