पुणे - २०१४ला मोदींचे सरकार आले तेव्हा आपल्याला मते पडली १७ कोटी. तेव्हा २८२ जागा मिळाल्या. त्यानंतर २०१९ला २२ कोटी मते मिळाली आणि जागा ३०३. ५ कोटी जागा वाढल्या. आता आपल्याला २०२४ला मते हवी आहेत ३० कोटी आणि जागा हव्या आहेत ४००च्या पुढे, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पक्षातर्फे उद्योग आघाडी प्रदेश कार्य समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, उद्योग आघाडीचे प्रदेश संयोजक प्रदीप पेशकार, सहसंयोजक सुधीर धुत्तेकर, अर्चना वाणी, पुणे शहर संयोजिका अमृता देवगांवकर, पश्चिम महाराष्ट्र संयोजक संजय अरणके यांच्यासह उद्योग आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
'हे सरकार काहीही करत नाही'
कोरोनाच्या काळात ६ महिने सर्व काही बंद होते. तरी उद्योग क्षेत्रासाठी या सरकारने विविध कर लावले. पाणी पट्टी, महापालिकेचे टॅक्स लावण्यात आले. महाराष्ट्र सरकारने याचे पॅकेज द्यायला पाहिजे. जर महाराष्ट्रातील सर्व उद्योग क्षेत्राचे ६ महिन्यांचे वीजबिल माफ केले, ६ महिण्याचे पाणीबिल माफ केले आणि त्या-त्या ठिकाणच्या महापालिकांचे चार्ज माफ केले तर हे सर्व ८ सव्वा आठ लाख कोटीपर्यंत जाईल. पण हे सरकार रिक्षावाल्यांना, फेरीवाल्यांना पॅकेज देणार नाही, उद्योगाला पॅकेज देणार नाही हे सरकार काहीही करत नाही, अशी टीका यावेळी त्यांनी केली.
'कोविडमध्ये उद्योग क्षेत्राला काहीही मदत केली नाही'
कोविड काळात औद्योगिक क्षेत्राला मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या. उद्योजकांना आपले रिटर्न्स फाइल करण्यासाठी मुदतवाढ दिली. त्याचबरोबर कर्जावरील व्याज माफ करून दिलासा दिला. पण राज्य सरकारने उद्योजकांना कवडीचीही मदत केली नाही. राज्य सरकारला ती करायला काय अडचण आहे? असा सवाल करून उद्योग आघाडीने राज्य सरकारकडे यासाठी मागणी करावी, अशी सूचना त्यांनी केली.