पुणे - केंद्राने दिलेले मिशन जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत मी कोल्हापूरला जाणार नाही. मी कोल्हापूरला परत जाणार या वाक्याने कोणीही हुरळून जाऊ नये. घाबरूनही जाऊ नये, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मी कोल्हापूरला परत जाणार आहे, असे विधान केले होते. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना परत जायचे होते तर आले कशाला, असा टोला लगावला होता. यावरू चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना प्रत्त्युत्तर दिला आहे.
'त्यांनी त्यांचे पाहावे'
आयुष्यात कुठेतरी स्थिरावायचे असते. तर त्या अर्थी मी गिरीश बापट यांच्या भाषणाचा संदर्भ घेऊन काल झालेल्या कार्यक्रमात बोललो होतो. मी जे बोललो त्याचा संदर्भ लगेच बॅग आवरून जाण्याचा नाही. अजित पवार आता बोलू लागले आहेत. त्यांना मी उत्तर देणार, हे नक्की. कारण हा केवळ क्रिया आणि प्रतिक्रियांचा खेळ आहे. अजित पवारांना आमच्या पक्षाची काय पडली आहे. त्यांनी त्यांचे पाहावे. त्यांनी त्यांच्या पक्षाची आणि त्यांच्या पदाची काळजी करावी. मुख्य म्हणजे भविष्यात शरद पवारांना एखादे मोठे पद कोणाला द्यायचे निर्णय घ्यावा लागला तर नक्की कोणाला देतील, याचा त्यांनी विचार करायला हवा, असे पाटील म्हणाले.
'काहींना आनंद झाला तर काहींना दुःख'
मी काल केलेल्या वक्तव्याने काहींना आनंद झाला. तर काहींना दुःख झाले आहे. मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे, त्यामुळे कोथरूड मतदारसंघापुरते माझे काम राहिले नाही. तर मला राज्याचे पाहायचे असते. मी राज्यभर फिरत असतो. कालच्या वाक्याचे इतके काही होईल असे वाटले नव्हते, असेही ते म्हणाले.