बारामती - पश्चिम बंगालमध्ये भाजपा सत्तेचा पूर्ण गैरवापर करीत आहे. बंगालमधील नागरिक हे स्वाभिमानी आहेत. बंगाली संस्कृतीवर आघात करण्याचा प्रयत्न कोणी केला. तर संबंध बंगाल एकसंध होतो, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. कोणी काही म्हणाले तरी बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल, याची मला खात्री आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी राज्यसभा खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभेच्या रणधुमाळीबाबत मत व्यक्त केले.
पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल हे देशाला नवीन दिशा देणारा ठरेल -
सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापैकी केवळ आसाममध्ये भाजपा सत्ता राखण्यात यशस्वी होईल. मात्र, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये इतर पक्षांना यश मिळेल. केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डावे पक्ष एकत्र आले आहेत. तसेच तेथील सत्ता देखील डाव्यांच्याच हातात आहे. त्यामुळे केरळमध्ये पुन्हा डाव्यांचे सरकार येईल. तर तामिळनाडूमधील लोकांचा कल स्टॅलिन व त्यांचा पक्ष डीएमके यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे तेथे डीएमकेची सत्ता येईल. आसाममध्ये भाजपाचे राज्य आहे. त्यामुळे आसाममध्ये इतर राजकीय पक्षांपेक्षा भाजपाची स्थिती चांगली आहे. त्यामुळे भाजपाला यश मिळेल. पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल हे देशाला नवीन दिशा देणारा ठरेल, असे शरद पवार म्हणाले.
राज्यपालावर व्यक्त केली नाराजी -
महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाही आणि घटनेने दिलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. मात्र, सध्याच्या राज्यपालांनी हा चमत्कार दाखवून दिल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला. पत्रकारांनी शरद पवार यांना राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
सरकार मात्र बघ्याची भूमिका घेतेय -
राज्य घटनेने सरकारला व मंत्रिमंडळाला अधिकार आहेत. त्या अधिकारानुसार शिफारशी झालेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणे, ही राज्यपालांची जबाबदारी आहे. मात्र, सध्याच्या राज्यपालांकडून त्यांची अंमलबजावणी केली जात नाही. पंतप्रधान मोदी स्वतः मुख्यमंत्री होते. राज्यपालांकडून अशाप्रकारची अडवणूक होत असल्याची त्यांचीही तक्रार होती. तसे त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवले होते. हे माझ्या पाहणीत आहे. दुर्दैवाने त्यांना हे सहन करावे लागले हे त्यांच्या राज्यात. आता महाराष्ट्रासारख्या राज्यात राज्यपाल अशीच अडवणूक करत आहेत. केंद्र सरकार मात्र बघ्याची भूमिका घेते, ही बाब चिंताजनक आहे, असा टोला पवारांनी लगावला.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका -
पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशाच्या म्हणजे एकूण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगूल आज वाजलं. पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा हा 27 मार्चला पार पडेल. तर दुसरा टप्पा हा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पातील मतदान 17 एप्रिलला, तर सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिलला आणि आठवा टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडेल.
प. बंगालमध्ये राजकीय स्थिती काय?
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे 148 जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. या निवडणुकीत भाजपा विरुद्ध तृणमूल असा अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. गेली निवडणूक 2016 मध्ये पार पडली होती. ममता बॅनर्जीच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षाने 211 जागांवरील विजयासह सपशेल बहुमत मिळवले व पश्चिम बंगालमधील आपली सत्ता राखली. तर काँग्रेसला 44 , डाव्या पक्षांना 26 आणि भाजपाला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता. आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये भाजपाला एकहाती सत्ता मिळवण्यात यश आलं नाही. ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावण्यात यावेळी तरी भाजपा यशस्वी होईल का याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे.
हेही वाचा - दीदींचा आज व्हिलचेअरवरून कोलकातामध्ये प्रचार, जाहिरनाम्याची घोषणा पुढे ढकलली