पुणे - शहरात आपले छंद जोपासण्यासाठी वाटेल ते कष्ट करणारे अनेक लोक असतात. अशाच अवलिया पुणेकरांपैकी नंदू कुलकर्णी आहेत. कुलकर्णी पक्षांवर नितांत प्रेम करतात. त्यांनी पक्षांसाठी सुंदर बाग तयार केली आहे. गेल्या तीस वर्षापासून ते पक्षांची मैफल भरवतात. सध्या सुरू असलेल्या पक्षी सप्ताहानिमित्त ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट...
ध्येयाने पछाडलेले पंचाहत्तरीचे व्यक्तिमत्त्व
सध्या वयाच्या पंचाहत्तरीत असलेले नंदू कुलकर्णी गेली 30 ते 40 वर्ष बाग काम, पक्षी निरीक्षण आणि निसर्ग संवर्धनाचा वसा जोपासत आहेत. कुलकर्णी यांनी आपल्या घराच्या गच्चीवर तब्बल 500 वेगवेगळी झाडे लावली आहेत. त्यात फुलांची झाडे, फळ झाडे, वेली आहेत. कुठल्याही रासायनिक फवारणीशिवाय नैसर्गिक पद्धतीने नंदू कुलकर्णी यांनी बाग जपली आहेत.
40 पेक्षा जास्त प्रकारच्या पक्ष्यांची रोजची हजेरी-
झाडांना रोज पहाटे पाच वाजता उठून ते पाणी घालतात. त्यांच्या या बागेत पहाटे विविध रंगी, विविध आकाराच्या आणि जातीच्या पक्ष्यांची मैफल भरलेली असते. सकाळी पक्षांच्या किलबिलाटाने कुलकर्णी यांच्या दिवसाला सुरुवात होते. साळुंकी, दयाळ, टोपीवाला, लाल गाल्या बुलबुल, लालबुड्या बुलबुल, चष्मेवाला, कोतवाल, शिंजीर, शिंपी, राखी वटवट्या, तांबट, हळद्या, वेडा राघू, जांभळा सूर्यपक्षी, असे सुमारे ४० विविध प्रकारचे पक्षी या बागेत येतात.
पक्ष्यांना अन्नधान्य टाकू नये-
दररोज पक्षी येत असल्याने त्यांचा दिवस आनंदात जातो. नंदू कुलकर्णी हे ‘निसर्ग संवाद’ नावाची संस्थाही चालवतात. त्याद्वारे पर्यावरण संवर्धन, पाणीबचत, प्रदूषण कमी करणे आदी विषयांवर ते काम करतात. पक्ष्यांना अन्नधान्य टाकू नये, आजकाल प्राणी, पक्ष्यांवर प्रेम दाखवण्यासाठी अनेकजण त्यांना खायला घालतात. पण पक्ष्यांचे खाद्य ते स्वत: शोधतात. त्यांना आपण सवय लावू नये. काही पक्षी बिया खातात, फळं खातात ते त्यांना मिळते. आपण फक्त त्यांना पाणी द्यावे, इतर धान्य वगैरे टाकू नये, असा सल्ला नंदू कुलकर्णी देतात.
जिज्ञासूंसाठी खास उद्यानशास्र अभ्यासक्रम-
पक्षी संवर्धन, झाडे संवर्धनासाठी याबाबतचा अभ्यास महत्वाचा आहे. जास्तीत जास्त लोकांनी याबाबतची माहिती घेतली पाहिजे. असे कुलकर्णी सांगतात. यातूनच जिज्ञासूंसाठी ते खास उद्यानशास्त्र अभ्यासक्रमही चालवतात. एकंदरीतच कुलकर्णी यांचा हा छंद आता एका ध्यासात बदलला आहे. सध्या पक्षी सप्ताह सुरू असून कुलकर्णी यांच्या या छंदाला उजाळा देण्याचा हा प्रयत्न...
हेही वाचा- दिवाळी स्पेशल: कोरोना काळात उटण्याने अभ्यंगस्नान करणं फायदेशीर
हेही वाचा- कुंभार व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतिक्षेत; मातीचे दिवे तसेच पडून