पुणे- गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने आंबेगाव तालुक्यातील डोंगराळ भाग असलेल्या सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीला सुरुवात झाली आहे. सातगाव पठार भागातील खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून बटाट्याची लागवड केली जाते. मात्र यंदा पावसाचे उशिरा आगमन झाल्याने उत्तर पुणे जिल्ह्यात बियाणे खराब होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरवर्षीप्रमाणे जून महिन्यात पावसाला सुरुवात होत असते. त्याच अंदाजावर शेतकऱ्यांनी बटाटा बियाण्यांची खरेदी केली आणि शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले. मात्र, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यानंतर जमिनीला वापसा आल्याने आता या परिसरातील शेतकऱ्यांनी बटाटा लागवडीला सुरुवात केली आहे. मात्र, अनेकांनी पाऊस लवकर येणार या आशेने बियाण्यांची खरेदी केली. त्यात वातावरणातील उकाड्याने बियाणे सडून खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे.
सातगाव पठार भागातील बटाटा हे पीक पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. मात्र दरवर्षीच्या पावसाच्या लंपडावामुळे शेतकरी संकटात येत आहे.
यंदाच्या वर्षी उशीरा का होईना पावसाचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे यंदाच्या वर्षी बटाटा उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल व चांगला बाजारभाव मिळेल, या आशेवर शेतकरी बटाटा लागवडीच्या तयारीस लागला आहे.