पुणे - कर्जवसुली करणाऱ्या बिगर वित्तीय कंपनीच्या अधिकाऱ्याचा कर्जदाराने खून केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. बजाज फायनान्सच्या मॅनेजरने थकलेल्या कर्जाचा हप्ता भरण्यास सांगितल्यामुळे चिडलेल्या कर्जदाराने मॅनेजरचा खून केला आहे. रवींद्र प्रकाश वळकुंडे (वय 28) असे खून झालेल्या फायनान्स मॅनेजरचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरळीकांचन गावातील सौरभ कॉम्प्लेक्समध्ये बजाज फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयात रवींद्र वळकुंडे हे मॅनेजर म्हणून कार्यरत होते. आरोपी राहुल गाढवे यांनी या कार्यालयातून वैयक्तिक कर्ज घेतले होते. या कर्जाचा थकित हप्ता भरण्यासाठी रवींद्र वळकुंडे यांनी आरोपीकडे तगादा लावला होता. याच रागातून आरोपीने हा खून केला आहे.
हेही वाचा-गुगल भारतामधील लघू उद्योगांना १०९ कोटींची करणार मदत
मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरोपीने बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयासमोर रवींद्र वळकुंडे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये मानेवर डोक्यामध्ये वर्मी घाव बसल्याने वळकुंडे यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अमोल भीमराव जोगदंड यांनी तक्रार दिली आहे. आरोपी राहुल लक्ष्मण गाढवे याला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.
हेही वाचा-शाळांच्या 'फी' वाढीविरोधात पालकांचे आझाद मैदानात आंदोलन