पुणे - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare Passes Away) यांचे सोमवारी पहाटे 5 वाजून 07 मिनिटांनी रूग्णालयात निधन झाले. वयाच्या 99व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील वैकुंठ स्मशान भूमीत त्यांचे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचा मुलगा अमृत पुरंदरे यांनी त्यांचे अंतिम संस्कार केले. बंदुकीच्या 21 फैरी झाडून बाबासाहेब पुरंदरे यांना अंतिम मानवंदना देण्यात आली. यावेळी मोठ्या जनसमुदायाने तसेच मान्यवरांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले.
काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्यांची तब्येत चिंताजनक असल्याच रविवारी संध्याकाळी सांगितलं जातं होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली वाहिली आहे. 'ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आणि अवघ्या महाराष्ट्राला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.' असे ट्विट गडकरींनी केले आहे. 'आम्हांला आणि आमच्यासारख्या करोडो लोकांना शिवराय खऱ्या अर्थाने समजले ते बाबासाहेबांमुळेच! नुकतीच पुण्यात त्यांची भेट घेतली होती, तेव्हा शतायुषी बाबासाहेब पुढेही त्यांच्या वाणीतून शिवराय जिवंत करत राहतील ज्यातून आणखी एक पिढी घडेल, असा ठाम विश्वास होता.' करोडो लोकांना शिवराय खऱ्या अर्थाने बाबासाहेबांमुळेच समजले असेही गडकरींनी म्हटले आहे.
नुकताच साजरा करण्यात आला होता 100 वा वाढदिवस
आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांचा 29 जुलै 2021 रोजी 100 वा वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करतानाच शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रावरच नव्हे, तर आख्ख्या देशावर असलेला प्रभाव सांगितला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांवर 12 हजाराहून अधिक व्याख्याने -
बाबासाहेब पुरंदरे यांचं मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं आहे. पुण्याजवळच्या सासवडमध्ये 29 जुलै 1922 रोजी त्यांचा जन्म झाला. पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरु केलं. 2015 सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर 12 हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.
जाणता राजा महानाट्याचे निर्माते -
बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. त्यांना 2015 साली महाराष्ट्रभूषण तर 2019 साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याचे गेल्या 27 वर्षांत 1250 हून अधिक प्रयोग झाले आहेत. हे नाटक हिंदी-इंग्रजीसह 5 अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे. 'जाणता राजा' मध्ये 150 कलावंत काम करतात आणि शिवाय हत्ती घोडेही असतात. प्रयोग करण्यासाठी मोठे मैदान लागते आणि तिथे फिरता रंगमंच उभारण्यासाठी 10 दिवस आणि उतरवण्यासाठी 5 दिवस लागतात.