पुणे - निर्जला एकादशीनिमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात पहाटे समाधीवर दुग्धअभिषेक करत महाआरती करण्यात आली. विना मंडपात व समाधी मंदिरात (गाभाऱ्यात) विविध रंगाच्या फुलमाळांनी सजविण्यात आले आहे. समाधी मंदिरातील दृश्य अत्यंत विलोभनीय असून प्रत्येक एकादशी निमित्ताने माऊलींच्या गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट केली जाते. माऊली मंदिरात केलेली ही सजावट पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य भाविक याठिकाणी दाखल होत असतात. मात्र, यावर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे यंदा भाविकांना घरातूनच ऑनलाइन दर्शन घ्यावे लागत आहे. देवस्थान बंद असले तरी मंदिरांमध्ये पूजा, फुलांची आरास अशा विधी नित्यनेमाने सुरू असल्याची माहिती देवस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी दिली आहे.
निर्जला एकादशी महत्व -
हिंदू धर्मात निर्जला एकादशी विशेष महत्व आहे. हिंदू धर्मात एकूण २४ एकादशी आहेत. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे खास महत्त्व असून ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीला पडणारी एकादशी म्हणजे निर्जला एकादशी. या एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. या एकादशीला पिण्याचे पाणी पिण्यास मनाई आहे. असे म्हणतात की या एकादशीच्या व्रताचे पालन केल्यास सर्व २४ एकादशींचे फळ प्राप्त होते. निर्जला एकादशीला धार्मिक शास्त्रात भीमसेन एकादशी म्हणूनही ओळखले जाते. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार गंगा दसराच्या दिवसापासून उपवासाने तामसिक भोजन सोडले पाहिजे. यासह, लसूण आणि कांदा वर्ज केलेले अन्न या दिवशी घ्यावे. रात्री जमिनीवर झोपावे. दुसर्या दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये जागे व्हावे आणि सर्वात आधी श्रीहरींचे नामस्मरण करावे. यानंतर, सकाळचे दैनंदिन कामे झाल्यानंतर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे आणि नंतर पिवळे वस्त्र (कपडे) घालुन सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून आपला दिनक्रम सुरू केला गेला पाहिजे.