पुणे - भारतीय सैन्यदलातील शिपाई पदाच्या परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्याला पुणे पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. भगतप्रितसिंग बेदी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याला सिकंदराबाद येथून अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, भारतीय सैन्य दलाच्या आर्मी शिपाई या पदाच्या भरतीसाठी देशभरातील 40 केंद्रांवर 28 फेब्रुवारी रोजी परीक्षा होणार होती. परंतु परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यांनी ही माहिती पुणे पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली, या कारवाईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून सात जणांना अटक करण्यात आली होती.
आतापर्यंत एकूण 9 जणांना अटक
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे चौकशी सुरू असताना, हा पेपर तामिळनाडू येथील सैन्य दलातील अधिकारी थिरू मुरुगन यांच्या मोबाईल व्हाट्सअप वरून आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून अधिक चौकशी केली असता, आणखी एक लष्करी अधिकारी वसंत किलारी यांना अटक करण्यात आली. या दोघांकडे सुरू असलेल्या अधिक चौकशीत भरती प्रक्रिया प्रमुख अधिकारी भगतप्रितसिंग बेदी यांनी हा पेपर लीक केल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने सिकंदराबाद येथे जाऊन त्यांना अटक केली. तर त्यांचा आणखी एक सहकारी नारनेपाटी वीरप्रसाद यांना दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 9 जणांना अटक करण्यात आली आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास गायकवाड, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहाय्यक निरीक्षक संदीप बुवा, भालेराव व त्यांच्या पथकाने केली आहे.
हेही वाचा - तौक्तेच्या तडाख्यात राज्यात 11 जणांचा मृत्यू; 12 हजार घरांचे नुकसान