पुणे - शहरातील एम फिटनेस सेंटरतर्फे योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अनोख्या पद्धतीने प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. वृक्षासन, नटराज आसन, पतंगासन, पश्चिमोत्तानासन, अशा विविध प्रकारच्या पाण्यातील योगासनांनी पुणेकरांनी नेत्रसुखद गारवा अनुभवला. विविध आसनांबरोबरच सुर्यनमस्कार, अॅक्वा अॅरोबिक्स प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. अनेक आजारांवर उपाय असलेल्या व आरोग्य उत्तम रहावे यासाठी आवश्यक असलेल्या पाण्यातील योगप्रकारांद्वारे पुणेकरांसमोर व्यायामाची महती उलगडण्यात आली.
एम फिटनेस सेंटरच्या वतीने योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बालगंधर्व येथील नांदे तलावात योगाभ्यासकांनी पाण्यामध्ये अॅक्वा अॅरोबिक्स, अॅक्वा सुर्यनमस्कार, अॅक्वा योगाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. पुण्यातील पोलीस देखील यामध्ये सहभागी झाले आणि पाण्यामधील आसने केली. डोळ्यांचे पारणे फेडणाऱया पाण्यातील प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना थक्क केले.
तापमानाने उच्चांक गाठलेला असताना पाण्यातील योगासनांनी पुणेकरांना थंडावा दिला. यावेळी वैविध्यपूर्ण आसनांसह सुर्यनमस्कार करण्यात आले. द्विपाद उत्तान पादासन, भुजंगासन, ताडासन, पद्मासन, नावकासन, मार्जारासन आणि पाण्यामध्येच शीर्षासन यांचे देखील सादरीकरण करण्यात आले. पाण्यामध्ये अॅरोबिक्स, सुर्यनमस्कार, योगा केल्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो. पाण्यात आसने केल्याने आपल्या शरीरातील स्नायूंचा व्यायाम होतो. अस्थमा, ह्रदयविकार तसेच पॅरेलिसिस झालेल्या व्यक्तींना पाण्यात व्यायाम करणे सोपे जाते तसेच ते त्यांच्या शरीरासाठी लाभदायक आहे. पाठीचा, गुडघ्याचा आजार असलेल्या व्यक्तींना देखील पाण्यातील व्यायाम प्रकारांमुळे फायदा पोहोचतो. गरोदर महिलांसाठी देखील पाण्यातील व्यायामप्रकार फायदेशीर आहेत.