पुणे - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख पंच आणि पुण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी किरण गोसावीला तीन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्याने ज्या तरुणांची फसवणूक केली, अशा तरुणांनी पुढे यावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले होते. त्यानंतर प्रकाश माणिकराव वाघमारे या तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
1 लाख 53 हजार रुपयांची केली फसवणूक
सन 2018-19 मध्ये प्रकाश हा गोसावीच्या पुण्यातील कार्यालयात गेला होता. त्यावेळी त्याने प्रकाशला परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखत त्याच्याकडून 1 लाख 53 हजार रुपये उकळले. मात्र, नोकरी न लावता फसवणूक केली, अशी तक्रार प्रकाशने दिली आहे.
काय आहे नेमके प्रकरण..?
2018 मध्ये गोसावीने आपल्या फेसबूक अकाउंटवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी असण्यासंदर्भात पोस्ट टाकली होती. त्या पोस्टवर चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्याच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने त्याला मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने तो परत भारतात आला. त्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार होता. त्यामुळे फसवणुकीसंदर्भात फरासखाना पोलीस किरण गोसावीचा शोध घेत होते. तक्रारदार चिन्मय देशमुख याच्या माहितीनुसार गोसावीने आपल्यासह पालघर, मुंबई, आंध्र प्रदेश, दिल्ली येथील अनेकांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली आहे.
नेमका कोण आहे के. पी. गोसावी ..?
किरण गोसावी हा के.पी.जी. ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचे मालक असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे के.पी.जी. ड्रीम्ज कंपनीचे मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के.पी.गोसावी याची ओळख आहे. तसेच आर्यन खान प्रकरणात किरण गोसावी हा पंच आहे.
हे ही वाचा - पुणे पोलीस किरण गोसावीला घेऊन मुंबईत; घराची, कार्यालयाची करणार तपासणी