पुणे - पुण्यातील आंबिल ओढा परिसरात महापालिकेच्यावतीने अतिक्रमण हटविण्याची कारवाई आज करण्यात आली. त्यातील 81 कुटुंबांना राजेंद्रनगर येथे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात येत आहे.
महापालिकेच्यावतीने सकाळी सकाळी कारवाई
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात महापालिकेच्यावतीने अतिक्रमण हटविण्याची कारवाई आज सकाळीसकाळीच करण्यात आली आहे. या वेळी स्थानिक आणि पोलीस प्रशासन आमनेसामने आले होते. कारवाईला विरोध करत असताना आंबिल ओढा येथे एका आंदोलकांनी आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला. खासगी बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओड्याची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट घालत असल्याचा आरोप यावेळी येथील स्थानिकांनी केला. काहीकाळ याठिकाणी तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते.
81 कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर
आंबील ओढ्यातील 81 कुटुंबांचे राजेंद्रनगर येथील मनपा वसाहत येथे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर होत आहे. एसआरएच्या यादीप्रमाणे नाव चेक करून लगेच करारनामा करून त्या कुटुंबांना राहण्यासाठी लगेच घर देण्यात येत आहे. तसेच त्यांचं घरसामान देखील शिफ्टिंगसाठी बिल्डरकडून माणसं ठेवण्यात आली आहे. या आंबील ओढ्यातील नागरिकांचा यादीप्रमाणें त्यांना शिफ्टिंग करण्यात येत आहे.
वाद काय आहे?
आंबिल ओढा परिसरात पालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलीस प्रशासन आमने-सामने आले आहेत. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला आहे. तसेच यावेळी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न झाला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली आहे.
बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यासाठी जबरदस्तीने आंबिल ओढ्यात असलेली घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी पोलीस आणि स्थानिकांमध्ये वाद पाहायला मिळाला. या कारवाईला आंबिल ओढ्यातील नागरिकांचा विरोध पाहायला मिळत आहे. सध्या आंबिल ओढ्यात मोठा पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.