पुणे - दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता तब्बल 10 महिने झाले आहेत. तरीही केंद्र सरकार त्याविषयी ठोस अशी चर्चा करायला तयार नाही. त्यामुळे आंदोलनाचे मध्यवर्ती नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने 27 सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप वगळता सर्व पक्षीयांच्यावतीने आज पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांच्यावतीने मंडईतील सुरू असलेली दुकाने बंद करण्याचे आवाहन देखील करण्यात आले.
हेही वाचा - अघोरी कृत्य.. वाईजवळ अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत नेऊन पूजनाचा प्रकार, मांत्रिक फरार
- असंतोष प्रकट सभेचे आयोजन -
केंद्र सरकारच्या निर्णय व धोरणामुळे पेट्रोल एकशे दहा रुपयांवर आले आहे. तसेच स्वयंपाकाचा घरगुती गॅस एक हजारच्या जवळ पोहचला आहे. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. बँका, विमानतळ, रेल्वे इतकच काय संरक्षण सामग्री कारखानेही केंद्र सरकारने विकायला काढले आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देशालाच देशोधडीला लावणाऱया या धोरणाविरोधात आज आंदोलन करण्यात येत आहे. स्वातंत्र्य लढ्यात राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असे अग्रलेख लिहून लोकमान्य टिळकांनी जनतेमधील इंग्रज सरकारबद्दलच्या असंतोषाला वाचा फोडली होती. त्या भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या महात्मा फुले मंडई येथील प्रतिमेला साक्षी ठेवून आज असंतोष प्रकट सभा आयोजित करण्यात आली होती.
- केंद्र सरकारच्या चेहऱ्यावरील रेष हालायला तयार नाही -
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 304 दिवस पूर्ण होत आहेत. तरीदेखील केंद्र सरकारच्या चेहेऱ्यावरील रेष हलायला तयार नाही, अशी परिस्थिती केंद्र सरकारची झाली आहे. मोदी सरकार आल्यापासून या देशाचे वाटोळं करण्याचं काम त्यांनी केले आहे. ज्या पद्धतीने मधल्या काळात मुघलशाही, निझामशाही यांचं तख्त पालटवण्यासाठी संपूर्ण देश एकत्र आला होता तसे मोदी आणि शाहा यांनी हा देश देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. त्यांचंही तख्त पालटवण्यासाठी या देशातील जनता एकत्र येतील, अशी प्रतिक्रिया यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली.
- आंदोलकांनी दुकाने केली बंद -
दिल्लीत सुरू असलेल्या किसान मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी भाजप वगळता सर्वपक्षीयांनी पुकारलेल्या भारत बंदसाठी पुण्यात आज आंदोलन करण्यात आले. महात्मा फुले मंडईत आंदोलन सुरू असताना, आंदोलकांच्यावतीने दुकाने बंद करण्यात आली.
हेही वाचा - चिथावणीखोर भाषण न करता संयमाने दौरा करावा, सोमैया यांना ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांचा सल्ला