पुणे - राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची माहिती सरल पोर्टलच्या माध्यमातून नोंदवली जाते. ही माहिती नोंदवताना त्या विद्यार्थ्याची जातही नोंद केली जाते. या पोर्टलवर एस. सी., एस. टी., ओ.बी.सी., व्हीजेएनटी, एसईबीसी आणि जनरल असे वेगवेगळ्या जातींचे पर्याय देण्यात आलेले आहेत. मात्र जनरल कॅटेगरीला क्लीक केल्यानंतर फक्त ब्राह्मण असा एकाच पर्याय दिसतो आहे, असा दावा अखिल भारतीय ब्रम्ह महाशिखर परिषदेकडून करण्यात आला आहे. फक्त ब्राह्मण जातीचा उल्लेख का, असा या संघटनेचा सवाल आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने वेब पोर्टलवर अशी रचना केलेली असू शकते, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दोनच पर्याय
याबाबत अखिल भारतीय ब्रह्म महाशिखर परिषदेचे उपाध्यक्ष सु. द. पुराणिक यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून यात दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्याची दखल संबंधितांनी घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र सरल पोर्टलवर सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या पोर्टलवर विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, वय, जात इत्यादी माहिती घेण्यात येते. ज्यामध्ये जात या रकान्यात जातींचा उल्लेख असायचा. परंतू गेल्या काही दिवसात या रकान्यात बदल करण्यात आला होता. जात "ब्राह्मण किंवा इतर" असे दोनच पर्याय आता दिसत होते. ही बाब योग्य नाही अशी भूमिका ब्राम्हण संघटनांकडून घेतली गेली.
सरकारकडून सापत्न वागणूक
ब्राह्मण व इतर असे का केले हे अनाकलनीय आहे. इतर मराठा, माळी, धनगर अशा विविध जाती असताना फक्त ब्राह्मण व ब्राह्मणेतर हेच का? ही गंभीर बाब असून यामुळे ब्राह्मण व ब्राह्मणेतर असा भेदभाव सरकारकडूनच केला जातो आहे, असा भ्रम निर्माण होत आहे असे सांगत, जातीयद्वेषाचा बळी ठरलेल्या ब्राह्मण समाजाला आता आपले लोकशाही शासन देखील सापत्न वागणूक देणार की काय असा प्रश्न ब्राह्मण समाजाच्या मनात निर्माण होत आहे, अस या पत्रात नमूद करण्यात आले होते. या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची माहिती घेत आहेत, की ब्राह्मण जातीची, अशी विचारणा करण्यात आली आहे.