पुणे - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काही निर्णय झाला नाही तर 6 जूनला रायगडपासून आंदोलनाला सुरुवात करू, कोरोनाचे नियम बघणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून नऊ दिवसांत खूप काही होऊ शकते, चर्चा होईल, काही मार्ग निघेल. चांगला मार्ग काढण्याचा प्रयत्न सगळेच जण करत आहेत. कुणावरही आंदोलनाची वेळ येऊ दिली जाणार नसल्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
पवारांकडून चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा समाचार
अजित पवार म्हणाले, काही पक्षांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू केले आहे. कुणीही आंदोलन केले की आमचा पाठिंबा आहे. असे ते जाहीर करतात. परंतु कसले आंदोलन आणि कशासाठी पाठिंबा अशा शब्दात अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
अजित पवार म्हणाले संभाजीराजे आणि माझी भेट झाली, आम्ही एकमेकांना नमस्कारही केला. परंतु राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेऊन अलाहाबाद हायकोर्टाची चीफ जस्टिस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ती समिती आता यावर काम करत आहे.
अजित पवारांचा शाब्दिक टोमणा
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल, अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या या भूमिकेचीही अजित पवार यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले, चंद्रकांत दादांचे आम्हाला ऐकावे लागेल, कारण राजेश टोपेंसहत आम्ही सर्व मराठा समाजात मोडतो. त्यामुळे आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल.
हेही वाचा - Maratha reservation - संभाजी राजे शिवराज्याभिषेकदिनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करणार