पुणे - आसाम येथे अडकलेल्या मुलांशी संपर्क केला आहे. मदत पुनर्वसन विभागातील असीम गुप्ता यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. त्या मुलांचा काही आर्थिक अडचण असेल किंवा काहीही असेल जे काही करावे लागेल ते करा. पण त्या मुलांना अडचण होऊ नये, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar on Assam Student ) यांनी दिली. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आसाम येथे 1 जानेवारीला लष्करी भरतीसाठी गेलेली महाराष्ट्रातील 60 ते 70 मुले अडकली आहे. त्या मुलांनी मदतीसाठी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांना फोनवरुन संपर्क साधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला मदत करावी, अशी विनंती ( Rupali Patil On Ajit Pawar ) केली. त्यानंतर तात्काळ रुपाली पाटील यांनी अजित पवार यांच्याशी संपर्क साधला. यावेळी अजित पवार यांनी लवकरात लवकर मुलांनी राज्यात घेऊन येणार असल्याचे आश्वासन दिले.
याबाबत प्रसारमाध्यमांना बोलताना अजित पवार म्हणाले की, आसाम येथील मुलांशी संपर्क केला आहे. त्याबाबत मदतपुनर्वसन विभागातील असीम गुप्ता यांना आदेश दिले आहेत. त्यांनी तेथील संबंधितांशी बोलून त्या मुलांना कसे आपल्याकडे आणता येईल यासाठी प्रयत्न करावे. त्यांना आर्थिक अडचण असेल किंवा काहीही असेल जे काही करावे लागेल ते करा. पण त्या मुलांना अडचण होऊ नये, अशा सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले, त्या मुलांनी कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना आणण्यासाठी अडचण निर्माण होईल. राज्य सरकार आसाम सरकारशी बोलत आहे. त्यांना लवकरच राज्यात घेऊन येऊ, असेही ते ( Dilip Walase Patil On Assam Student ) म्हणाले.
राज्यात आल्यानंतर 7 दिवस विलगीकरणात राहू पण..
राज्यातील 60 ते 70 मुले 1 जानेवारीला लष्कर भरतीसाठी आसाम हबलॉंग येथे गेली होती. तेव्हा रॅपिड चाचणी केल्यानंतर त्यांना येथील रुग्णालयात ठेवण्यात आले. आमचे दोन्ही डोस घेतलेले असताना देखील आम्हाला येथे ठेवण्यात आले आहे. आम्हाला येथे जेवणही चांगल्या दर्जाचे मिळत नाही. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवाहन करत आहो की, लवकरात लवकर येथून बाहेर काढाव. आम्ही राज्यात आल्यानंतर 6 ते 7 दिवस विलगीकरणात राहू पण आम्हाला बाहेर काढा, अशी विनंती योगेश मोसमकर या विद्यार्थ्यांने केली आहे.