पुणे - लॉकडाऊनला विरोध दर्शवत पुणे व्यापारी महासंघाने आजपासून आपली दुकाने उघडण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु आता मात्र हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी व्यापाऱ्यांचा मागण्यांचा विचार करू, असे आश्वासन दिले होते. तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे देखील व्यापाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. या दोघांची बैठक झाल्यानंतर दुकाने उघडण्याचा निर्णय घेऊ, अशी भूमिका पुणे व्यापारी महासंघाने घेतली.
कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिकेने शहरातील दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. परंतु पुणे व्यापारी महासंघाने या निर्णयाला विरोध करत आंदोलन केले होते. सोमवारपासून दुकाने उघडणार असल्याचा इशाराही दिला होता. यावर पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला व्यापाऱ्यांशी चर्चा करण्याचा आदेश दिला होता.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर यावर निर्णय
पवार यांच्या आदेशानुसार व्यापार्यांचे शिष्टमंडळ आणि विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची रविवारी रात्री बैठक झाली. या बैठकीनंतर व्यापारी महासंघाने दुकाने उघडण्याचा निर्णय मागे घेतला असून मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर यावर निर्णय घेतला जाईल असे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी खटले भरल्यास जबाबदारी घेणार नाही-
फत्तेचंद रांका म्हणाले, पुणे व्यापारी महासंघाने दुकाने उघडण्याचा निर्णय एक दिवस पुढे ढकलला आहे. मुख्यमंत्री आणि अजित पवार यांची बैठक झाल्यानंतर दुकाने उघडायची की नाही यावर आपण निर्णय घेऊ. त्यामुळे तोपर्यंत कुणीही दुकाने उघडू नये. व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्यावर पोलिसांनी खटले भरल्यास व्यापारी महासंघ जबाबदारी घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डबल व्यापारी महासंघाच्या या निर्णयानंतर पुणे शहरातील दुकाने आज( सोमवारी) देखील उघडणार नाहीत.