पुणे - या देशातील शेतकरी पुढे गेला तर देश पुढे जाईल, मात्र सध्या दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता देश मागे जात असल्याची टिप्पणी अभिनेते सयाजी शिंदे यांनी केली आहे. ते पिंपरी-चिंचवड शहरात पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या पाठीशी राहा, असेदेखील त्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांवरील तेलुगू चित्रपटातील संवाद
अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, की तेलगू चित्रपटातील डायलॉग आठवतो. एक देश मागे गेला तर त्या देशातील शेतकरी मागे जातो, अस समजायचे आणि देश पुढे गेला तर त्या देशातील शेतकरी पुढे गेला असे म्हणावे. परंतु, दिल्लीमधील शेतकऱ्यांचे आंदोलन पाहता आपला देश खूप मागे चालला आहे, असे ते म्हणाले.
'शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे'
आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. शेतकरी पुढे गेला पाहिजे. तरच, आपला देश पुढे जाणार आहे. हे सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.
'ती झाडे वाचवण्यासाठी प्रयत्न करणार'
बारा वर्षांपूर्वी महानगरपालिकेकडून १ एकर ४० गुंठे जागा निमा या संस्थेने 21 वर्षांचा करारनामा करून घेतली होती. गेल्या बारा वर्षात संबंधित ओसाड जागेत निमा संस्थेने वनराई फुलवली असून साडेचारशे वनस्पती लावण्यात आलेल्या आहेत. मात्र, अचानक सदरची जागा एमआयडीसीने विकल्याचे सांगून काही जण महानगरपालिकडे झाडे तोडण्यास सांगत आहेत. मुख्य मुद्दा हा आहे, की ४५० झाडांचा बळी चालला आहे. मात्र, तीच झाडे मनुष्य तोडायला निघाला आहे. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. ती झाडे वाचवायची आहेत. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे शिंदे म्हणाले आहेत.