पुणे - ससून रुग्णालयात पार्क करण्यात येणाऱ्या दुचाकी वाहने चोरणारा चोरट्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पुणे व सातारा शहरातून चोरलेल्या 13 दुचाकी वाहने जप्त करण्यात आले आहेत. अख्तर चांद मुजावर (रा. बनवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
झटपट पैसे कमावण्याच्या नादात करत होता चोरी
अख्तर मुजावर हा बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. पण, टाळेबंदीमुळे काम गेले. पैशाची अडचण भासू लागली. दरम्यान, टाळेबंदीत शिथीलता मिळाल्यानंतर ऑगस्ट, 2021 मध्ये अख्तर हा ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या त्याच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी आला होता. त्याला मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने रुग्णालयाच्या आवारात दिसली. त्यानंतर त्याने 5 ते 6 वाहने चोरली. ती विकून मोठे पैसे मिळतील या उद्देशाने त्याने चोरलेली वाहने विकण्याचा त्याने प्रयत्न केला. पण, कागदपत्रक नसल्याने कोणीही ती वाहने विकत घेतली नाहीत.
सुमारे दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले
सैफन मुजावर (रा. बिबवेवाडी, पुणे) हे ऑगस्ट, 2021 मध्ये त्यांच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी ससून रुग्णालयात गेले होते. नातेवाईकास भेटून आल्यानंतर आपली दुचाकी चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. रुग्णालय परिसरातून दुचाकी वाहने चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी बंडगार्डन पोलीस ठाण्यात येत होत्या. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असताना गुन्ह्यातील दुचाकी चोरी करतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले. त्यानंतर सुमारे दोनशे खासगी व सरकारी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केल्यानंतर आरोपी हा सातारा जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अख्तर मुजार यास अटक करून त्याच्याकडे चौकशी केली.
13 दुचाकी वाहने जप्त
ससून रुग्णालय परिसरातील 6, पुणे शहर, हडपसर, निगडी, स्वारगेट परिसर तसेच सातारा शहर अशा विविध ठिकाणाहून एकूण 13 दुचाकी वाहने चोरी केल्याचे कबूल केले. अख्तरने चोरलेल्या सर्व 13 दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
हे ही वाचा - धक्कादायक : 16 वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य; आरोपी मित्राला अटक