पुणे - शहर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेते पदी माजी उपमहापौर आबा बागूल यांची सोमवारी पक्षाकडून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून गटनेतेपद बदलण्याच्या चर्चेला पुर्ण विराम मिळाला होता. आबा बागूल यांची पक्षाकडून दुसऱ्यांदा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी त्यांनी आपला पदभार स्विकारला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पुणे शहर महापालिकेच्या काँग्रेस गटनेते पदी ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांची निवड करण्यात .येत असल्याचे पत्र सोमवारी दिले. त्यानुसार नगरसेवक आबा बागुल यांनी आज (मंगळवारी) पालिकेच्या गटनेते पदाची सूत्रे हाती घेतली. माजी गटनेते अरविंद शिंदे यांनी या पदावर गेली 7 वर्ष काम केले. या काळात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच प्रभाव निर्माण केला होता.
हेही वाचा... सोयाबीन उगवण क्षमेतेप्रकरणी समिती गठित, दोषींवर कडक कारवाई - कृषी मंत्री
आबा बागुल हे मागील 30 वर्षांपासून नगरसेवक आहेत. त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष, उपमहापौर व विरोधी पक्ष नेते या पदावर काम केले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशातील नेते मंडळींनी जी संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानत आहोत. तसेच आगामी काळात कोरोनामुळे पुणे शहरात जे संकट आले आहे, ते दूर करण्याचे प्रयत्न करणार आहोत. तसेच सत्ताधारी भाजप पक्षावर नजर ठेऊन महापालिकेत शहराच्या आणि पुणेकरांच्या दृष्टीने अनेक पाऊले उचलणार, असा विश्वास गटनेते पदाचा पदभार स्विकारल्यानंतर आबा बागुल यांनी व्यक्त केला. तसेच येणाऱ्या 2022 च्या महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून देणार असल्याचेही आबा बागुल यांनी सांगितले.