पुणे - येत्या २७ जानेवारीपासून पुणे शहरात इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंतची शाळा सुरू करण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्कूल बससेवा सोशल डिस्टन्सिंगमध्ये चालू करावी अन्यथा महापालिकेने या विद्यार्थ्यांसाठी पीएमपीएमएलची सुविधा सुरू करावी, अशी मागणी पुणे महापालिकेचे विरोधीपक्ष नेते आबा बागुल यांनी केली आहे.
'स्कूलबस सेवा सोशल डिस्टन्सिंगनुसार सुरू करावी'
२३ मार्च २०२० रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आला होता. टप्प्याटप्प्याने देशातील व शहरातील लॉकडाउन कमी करण्यात आला असून कोरोनाचे नियम पाळून ४ जानेवारी २०२१ रोजी पुणे शहरातील ९वी ते १२वीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्याचप्रमाणे आता २७ जानेवारीरोजी ५वी ते ८वी पर्यंतची शाळा सुरू करण्यात येणार आहे. शाळा सुरू करत असताना शाळेतील विद्यार्थी स्कूल बसमध्ये येत असतात. स्कूल बसमध्ये कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर राखले जात नाही. पुणे शहरात विद्यार्थ्यांची वाहतूक रिक्षा आणि स्कूल बसमध्ये मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे एखादा विद्यार्थी जर कोरोना पॉझिटिव्ह असल्यास स्कूल बसमधील सर्व विद्यार्थ्यांना त्याची बाधा होईल व शाळेत ती झपाट्याने विद्यार्थ्यांमध्ये पसरेल. त्यामुळे शहरात परत कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता टाळता येणार नाही. यासाठी स्कूल बससेवा सोशल डिस्टन्सिंगनुसार सुरू करावी आणि ज्या स्कूल बसमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार नाही, अशा विद्यार्थ्यांना पालकांनी शाळेत सोडावे, अशी अट घालण्यात यावी व अन्यथा महापालिकेने या विद्यार्थ्यांसाठी पीएमपीएमएलची सुविधा सुरू करावी, अशी मागणी पुणे महापालिकेचे विरोधीपक्ष नेते आबा बागुल यांनी केली आहे.
'...अन्यथा विद्यार्थ्यांना पालकांनी शाळेत सोडावे अशी अट घालण्यात यावी'
पुणे शहरात मोठ्या प्रमाणात रिक्षा आणि स्कूल व्हॅनमधून विद्यार्थ्यांना शाळेत सोडले जाते. एका एका रिक्षात १५ ते १६ मुलांना शाळेत ने-आण केली जाते. कोरोनाच्या या काळात अशापद्धतीने शालेय विद्यार्थ्यंची ने-आण धोकादायक ठरू शकते. एखादा विद्यार्थी जरी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास स्कूल बस व रिक्षामधील सर्व विद्यार्थ्यांना त्याची बाधा होईल व शाळेत ती झपाट्याने विद्यार्थ्यांमध्ये पसरेल. त्यामुळे शहरात परत कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता टाळता येणार नाही. म्हणून स्कूल बससेवा सोशल डिस्टन्सिंगमध्ये चालू करावी अन्यथा विद्यार्थ्यांना पालकांनी शाळेत सोडावे, अशी अट घालण्यात यावी, अशी मागणीही पालिका आयुक्तांकडे बागुल यांनी केली आहे.