पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचारी दत्तात्रेय कांबळे यांचा मुलगा मागील नऊ महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर आहे. तर लहान मुलाचा गंभीर आजाराने मृत्यू झालेला आहे. सध्याच्या परिस्थितीत दत्तात्रेय कांबळे यांची कुटुंबीयांना गरज असतानाही, कांबळे यांनी मात्र कोरोनाच्या लढाईत कर्तव्यावर जाणेच पसंत केले आहे. कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये दत्तात्रय कांबळे आपली ड्युटी करत आहेत. परंतु, काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असून स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालत आहेत. त्यांना दत्तात्रेय कांबळे यांनी घरात राहण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा... #coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच कुटुंबातील चार महिला कोरोना पॉझिटिव्ह
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिंचवड पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी दत्तात्रेय कांबळे हे कार्यरत आहेत. अत्यंत प्रामाणिक आणि शांत स्वभावाचे कांबळे यांना दोन मुले होती. अक्षय आणि आशिष अशी त्या दोघांची नावे. सर्व काही सुखात सुरू असताना दुर्दैवाने त्यांच्या लहान मुलाला अत्यंत गंभीर आजाराने ग्रासले आणि त्यातच त्याचा उपचारादरम्यान २००८ मध्ये मृत्यू झाला. हे थोडे की काय, दुसरा मोठा मुलगा अक्षय हा देखील आजारी आहे. त्यामुळे मागील नऊ महिन्यांपासून तो व्हेंटिलेटरवर आहे.
हेही वाचा... ईटीव्ही भारत विशेष : कोरोना आणि लॉकडाऊनचा महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रावरील परिणाम
अक्षयवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. साडेचार महिने तो अतिदक्षता विभागात होता. मात्र, डॉक्टरांनी त्याला घरी घेऊन जाण्यास सांगितले. आज देखील अक्षय व्हेंटिलेटरवर असून आई वैजंती यांनी आणि वडील दत्तात्रेय कांबळे हेच त्याची सुश्रूषा करतात. अशा परिस्थितीमध्ये देखील दत्तात्रेय कांबळे हे त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत. त्यांनी घरात रहावे किंवा कुटुंबीयांना त्यांची गरज आहे. मात्र, घराबाहेर करोना विषाणूने थैमान घातले असल्याने कांबळे यांनी आपल्या कर्तव्यावर जाणे अधिक महत्वाचे मानले आहे.
लॉकडाऊनमुळे पोलिसांना रस्त्यावर उतरून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी लागत आहे. अनेक वेळा सांगून देखील नागरिक घराबाहेर पडत आहेत. यावेळी दत्तात्रेय कांबळे यांच्या पत्नी वैजंती कांबळे या म्हणाल्या की, तुम्ही सुरक्षित राहावे म्हणून हे पोलीस कर्तव्य बजावत आहेत. पोलिसांच्या काही अडचणी देखील ते कर्तव्यावर जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे आणि नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.