पुणे - घरात एकट्या असलेल्या महिलांना लुटणाऱ्या चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून सोने व चांदीसह २ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला असून सोमवारपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आशिष मोहन धायगुडे (वय31) असे आरोपीचे नाव आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून त्याचा शोध घेण्यात आला.
काही दिवसांपूर्वी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरात टीव्ही बघत बसलेल्या एका महिलेला आरोपीने घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देत अंगावरील सोने, चांदीचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले होते. याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार हिंजवडी पोलीस हे संबंधित आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, आरोपी हा बावधान येथील रामनगर परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अतिक शेख यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो घरात एकट्या असलेल्या महिलेला हेरून थेट घरात घुसून चोऱ्या करत असल्याची कबुली दिली. काही दिवसांपूर्वी त्याने एका महिलेवर चाकूने वार करत सोन्याचे दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने प्रतिकार केल्याने त्याचा डाव फसला. हिंजवडी पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघड झाले असून त्याच्यावर पुणे शहरात अनेक गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, गुन्हे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी गिझे, विवेक गायकवाड, वरुडे, वायबसे, बाळू शिंदे, किरण पवार, नितीन पराळे, कुणाल शिंदे, कुंभार यांनी केली आहे.