पुणे - राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचा सर्वाधिक ताण आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणेवर पडत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. परंतू असे असले तरी नागरिकांना मात्र कोरोना प्रतिबंधक नियमांचा विसर पडल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पोलीस कोरोनाचे गांभीर्य समजावून सांगताना आपले कर्तव्य पार पाडत आहेत.
पुणे पोलीस दलात पोलीस नाईक असलेल्या निर्मला पडघमकर या कोरोनाचा प्रकोप पाहता 9 महिन्याच्या बाळाला घरात ठेवून कर्तव्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. कोरोनाचा धोका पाहता राज्य सरकारने पुण्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. अशा परिस्थितीत घरी तान्हे बाळ असतानाही आराम करण्याऐवजी त्या कडक उन्हात कर्तव्य बजावत आहेत.
नऊ महिन्याच्या बाळाला घरात ठेऊन महिला पोलीस कर्तव्यावर हजर.. आपल्या कर्तव्यविषयी सांगताना निर्मला म्हणतात, कोरोनाचे संकट पाहता आम्हालाही घरात बसावे वाटते. पण आम्ही तसे करू शकत नाही, कारण लोकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरावेच लागते. चौका चौकात थांबून समोरची व्यक्ती कशी आहे हे माहीत नसतानाही त्याची चौकशी करावी लागते. अशावेळी आपल्याला कोरोना होईल का? याचा विचारही मनात येत नाही. कारण 'ड्युटी फर्स्ट' हे डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही कर्तव्य बजावत असतो.पोलीस रात्रंदिवस काम करत आहेत. नागरिकांनी नियम पाळले तर कोरोनाची साखळी देखील ब्रेक करता येईल. नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेतली तर पोलीसही सुरक्षित राहतील. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. घरी छोटे बाळ असतानाही कोरोनाच्या या संकटात सामान्य जनतेची काळजी घेणाऱ्या या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.