पुणे - समृद्ध जीवन आर्थिक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या महेश मोतेवार याच्या 5 आलिशान गाड्या राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केल्या आहे. त्यामध्ये मिनी कूपर, पजेरो, मायक्रा, स्विफ्ट डिझायर अशा गाड्यांचा समावेश आहे.
22 राज्यात 28 गुन्हे दाखल
शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व अन्य व्यवसायाची जोड देत त्यातुन मोठा आर्थिक फायदा मिळण्याचे आमिष दाखवून महेश मोतेवार व त्याच्या साथीदारांनी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातील शेतकरी व गुंतवणुकदारांची फसणूक केली होती. याप्रकरणी समृद्ध जीवनच्या महेश मोतेवारविरुद्ध 22 राज्यात 28 गुन्हे दाखल आहेत.
पाच आलिशान गाड्या जप्त
राज्यात विविध ठिकाणी घडलेल्या या घोटाळ्याचा तपास काही दिवसांपूर्वी 'सीआयडी'कडे देण्यात आला होता. 15 दिवसांत पथकाने मोतेवारच्या आलिशान गाड्या जप्त करण्यावर भर दिला होता. त्यानुसार मोतेवारच्या धनकवडी येथील बंगल्यातुन 3 गाड्या जप्त केल्या, त्यानंतर एजंटकडे असणाऱ्या 2 गाड्या जप्त केल्या. त्यामध्ये मिनी कूपर, पजेरो, मायक्रा, स्विफ्ट डिझायर, इंडिका अशा गाड्याचा समावेश आहे.