पुणे - कमिशनच्या स्वरूपातील खंडणी न देणाऱ्या तरुणाचे पाच जणांच्या एका टोळक्याने अपहरण करून नग्न धिंड काढल्याचा संतापजनक प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरात घडला. पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनंतर कोंढवा पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी (१६ नोव्हेंबर) मध्यरात्री तीन वाजता घडली.
हेही वाचा - दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढली; २० नोव्हेंबरपर्यंत भरता येणार अर्ज
सेहर गुलाम गौस शेख (वय 36), मतीन उर्फ नौशाद खान (वय 24), राहुल ईसरार शेख (वय 25), उबेद अली शेख (वय 24) आणि सिद्दीकी इद्रिस शेख (वय 28) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, आणखी तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा मेकॅनिक असून तो महागड्या कार दुरुस्त करण्याचे काम करतो. आरोपी सेहर गुलाम गौस शेख आणि मतीन उर्फ नौशाद खान हे तक्रारदार तरुणाचे मित्र आहेत. या दोघांनी तक्रारदाराकडे काही दिवसांपूर्वी जॅगवार कार दुरूस्तीसाठी पाठवली होती. कमिशनपोटी साडेचार लाख रुपयांची खंडणी मागितली होती. हे पैसे दिले नाही म्हणून आरोपींनी शनिवारी रात्री इतर आरोपींच्या मदतीने त्याला मारहाण करत नग्न केले.
हेही वाचा - मुंबई महापालिकेत भाजपच्या गटनेता बदलाच्या हालचाली; 'ही' नावे आघाडीवर?
त्यानंतर त्याचे रेंज रोव्हर गाडीत जबरदस्तीने बसवून अपहरण केले आणि खराडीत नेऊन नग्न अवस्थेत त्याची धिंड काढली आणि लोखंडी रॉडने त्याला जबर मारहाण केली. त्याच्या खिशातील १७ हजार रोख रक्कम आणि पावणेतीन तोळे सोन्याची चैन हिसकावून घेतली.
सुरवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. मात्र, एक तरुण नग्नावस्थेत फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत आरोपींना अटक केली.