पुणे - कोरोना संसर्गामुळे ऑनलाईन परीक्षा घेणे हे खूप मोठं आव्हान विद्यापीठांपुढे होते, हे आव्हान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यशस्वीपणे पेलले. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्हीदेखील बदलता काळ स्वीकारत पुढे चला, असा संदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११८ वा पदवी प्रदान समारंभ मंगळवारी १५ जून २०२१ रोजी पार पडला, या कार्यक्रमाला राज्यपालांची ऑनलाइन उपस्थिती होती. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, सन्मानीय अतिथी म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हेही ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. तर विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात पार पडलेल्या या समारंभाला विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू, कुलसचिव यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या समारंभात वेदांत मुंदडा या विद्यार्थ्याला 'द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, डॉ. शंकर दयाळ शर्मा सुवर्णपदक' प्रदान करण्यात आले. सन २०१९-२० चा 'बेस्ट स्टुडंट'चा मानही वेदांतने पटकावला, यावेळी १ लाख ६१ हजार ५९१ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र पोस्टाद्वारे देण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले.
समाजाप्रतीची संवेदनशीलता जपली पाहिजे - महाजन
या प्रसंगी बोलताना सुमित्रा महाजन म्हणाल्या की, शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण नोकरीत पॅकेजचा विचार करतो. परंतु त्याबरोबर आपण समाजाचं देणं लागतो, याचाही विचार असावा. समाजाप्रतीची संवेदनशीलता आपण कायम जपली पाहिजे. उदय सामंत म्हणाले, विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा घेण्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. तसेच नवे शैक्षणिक धोरण आत्मसात करण्यातही विद्यापीठ पुढे आहे. कोरोना काळात 'एनएसएस'च्या विद्यार्थ्यांनी खूप मोठं समाजकार्य केलं याचं मला कौतुक आहे. यावेळी प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठामार्फत राबविण्यात आलेले उपक्रम व योजनांचा आढावा सर्वांपुढे मांडला. पुढील १० वर्षांच्या वाटचालीची पायाभरणी आम्ही या चार वर्षांत केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगतिले. हा पदवीदान समारंभ विद्यार्थ्यांनी थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून अनुभवला.
हेही वाचा -केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी? नारायण राणेंसह, अजून कोणाच्या नावाची चर्चा?