पणजी- गोव्यात हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प भागिदारीत उभारण्यासाठी फ्रान्स सरकारला प्रस्ताव देण्यात आला होता. त्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. जर यामध्ये फ्रान्स सरकार इच्छुक नसेल तर अन्य भागिदारासोबत हा प्रकल्प उभारण्यात येईल, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. पुढील आठवड्यात गोव्यात एअरमन भरती आहे. त्याची माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पाटो-पणजीतील पर्यटक भवनात आयोजित या पत्रकार परिषदेसाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका उपस्थित होत्या.
तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण खात्यासाठी हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प उत्तर गोवा जिल्ह्यातील सत्तरी तालुक्यात उभारण्याचे निश्चित केले होते. त्यावेळी फ्रान्समधील सँरन ग्रुप (saran group) हिंदुस्थान अँरोनॉटिक्ससोबत काम करेल असे ठरले होते. परंतु, त्यानंतर या प्रकल्पाचे पुढे काय झाले हे समजले नाही. आता नव्या सरकारमध्ये उत्तर गोव्याचे खासदार असलेले नाईक संरक्षण मंत्री असल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे या विषयी विचारले असता नाईक म्हणाले, फ्रान्स सरकारसोबत लवकरच चर्चा केली जाईल. जर ते भागिदारासाठी इच्छुक नसतील तर अन्य भागिदार शोधला जाईल. परंतु, हा प्रकल्प गोव्यात निश्चित उभारला जाणार असून पुढील तीन महिन्यात याची दिशा स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.
भारतीय वायु दलासाठी खास गोमंतकियांसाठी आयोजित भरती प्रक्रियेविषयी बोलताना मंत्री नाईक म्हणाले की, भारतीय वायुदलातील एअरमन पदासाठी दि. 27 ते 30 ऑगस्ट दरम्यान ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद इनडोअर स्टेडियममध्ये भरती प्रक्रिया होणार आहे. रोजगाराबरोबर देशसेवा करण्याची या निमित्ताने संधी मिळणार आहे. देशाच्या मानाने गोवा उशीरा मुक्त झाला. त्यामुळे या क्षेत्राकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. आता यानिमित्ताने जागृती होत आहे. यासाठी 12 वीत इंग्रजी विषयामध्ये 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण उमेदवार सहभाग घेऊ शकतात. अधिकाधिक गोमंतकीय युवकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
नुकत्याच येऊन गेलेल्या पुरामुळे नाईक यांच्या मतदारसंघातील गावांना सर्वाधिक फटका बसला. त्याची पाहणी त्यांनी सोमवारी केली होती. त्यावर बोलताना नाईक म्हणाले, पुरग्रस्तांना भेटलो आहे. दोन दिवसांत नुकसानीचा अहवाल सरकारला मिळेल. ज्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होईल. अहवाल प्राप्त होताच तात्काळ केंद्राकडे नुकसान भरपाई मागितली जाईल. गणेश चतुर्थी सण तोंडावर आल्याने तत्पूर्वी नुकसान भरपाई मिळावी, अशी पुरग्रस्तांची मागणी आहे. त्यासाठी शक्य ते प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.