पणजी - गोव्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत ५ हजार ३०७ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ३ एप्रिलपर्यंत फक्त ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांना यशस्वी उपाचारानंतर घरी पाठविण्यात आले, तर सोमवारी चाचणी केलेले सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
गोवा सरकारने नियोजनबद्ध काम करताना कोरोना संसर्ग रोखला आहे. यासाठी आवश्यक प्रयोगशाळा आणि चाचणी किट्स तयार केल्या. तसेच नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. 29 जानेवारी 2020 पासून आजपर्यंत 5 हजार 307 संशयित व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. यामध्ये 3 एप्रिलपर्यंत केवळ 7 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यांच्यावर यशस्वी उपचार करून सोडून देण्यात आले.
सोमवारी दिवसभरात देशभरातून आलेल्या 167 जणांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. 459 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १ हजार ७९४ आंतरराष्ट्रीय प्रवाशांना घरी क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच गोव्यातील दोन्ही जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत.