पणजी - गोव्याची राजधानी पणजीसह तिसवाडी आणि फोंडा तालुक्याला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गुरुवारी सकाळी कुर्टी खांडेपार येथे वाहून गेली. त्यामुळे पाणी वाया जाण्याबरोबर येथील रस्ताही वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गेली वाहून पणजी शहराला पाणीपुरवठा करणारी ही जलवाहिनी आहे. ज्या ठिकाणी ही वाहिनी फुटली तेथे मातीचा भराव घालण्यात आला होता. त्यात ही जलवाहिनी टाकण्यात आली. परंतु, योग्यप्रकारची काळजी घेण्यात आली नाही. शिवाय या परिसरातील झाडे रस्ता रुंदीकरणसाठी तोडण्यात आली. तसेच रस्त्याच्यामधून पाणी वाहून जाण्यासाठी मार्गिकाही ठेवण्यात आली. मागील आठवडाभरापासून या परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे हा मातीचा भराव कमकुवत बनल्याने वाहून गेला. त्याबरोबर खांडेपार येथील जलवाहिनीही वाहून गेली. त्यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले. शिवाय या कामासाठी खर्च करण्यात आलेले लाखो रुपयेही पाण्यात गेले. घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.घटनेविषयी स्थानिक ग्रामस्थ संदीप पारकर म्हणाले की, सहा महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाच्या माध्यमातून याची कल्पना देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज ही घटना घडली आहे. जेथे जलवाहिनी फुटली त्या भागात माती आहे. माती वाहून गेल्यामुळे खांडेपारच्या शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.