पणजी - गोवा विधानसभेचे पाच दिवसीय हिवाळी अधिवेशन कालपासून(सोमवार) सुरू झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानंतर कामकाजाला सुरुवात झाली. 2020 मध्ये निधन झालेल्या गोव्यासह देश-विदेशातील मान्यवरांना श्रद्धांजली वाहून कालचे कामकाज स्थगित करण्यात आले. काल सकाळी राज्यपाल कोश्यारी यांना विधानसभा प्रांगणात सलामी दिल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, सभापती राजेश पाटणेकरांनी त्यांना सभागृहात नेले. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन राज्यपालांनी भाषण केले.
राज्यपालांनी केले राज्य सरकारचे कौतुक -
राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यसरकारच्या कामाचे कौतुक केले. तसेच कोविड-19 काळात त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने केलेले नियोजन, आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा यासारख्या योजनांचीही स्तुती केली. कायदा आणि सुव्यवस्था कशाप्रकारे प्रभावीपणे राबवण्यात येते हेही सांगितले. राज्यातील गुन्हेगार शोधण्याचे प्रमाण 92 टक्के आहे. जे 2019च्या तुलनेत जास्त आहे. नशामुक्त भारत अभियान राबवताना अमलीपदार्थमुक्त गोवा राज्य हे सरकारचे लक्ष असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.
विरोधकांनी केला निषेध -
राज्यपाल भाषण आटोपून सभागृहाबाहेर निघत असताना विरोधी पक्षातील आमदारांनी दंडावर काळ्यापट्ट्या बांधून 'गोव्यात कोळसा नको'च्या घोषणा दिल्या. त्यानंतर सभापती पाटणेकर कामकाज पुढे नेत असतानाच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी उभे राहत यावेळी तरी पूर्णवेळ अधिवेशन घ्यायला हवे होते. ज्यामुळे जनतेच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चा करता आली असती. पाच लक्षवेधी सुचनांची मागणी केली असता केवळ तीन घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे या अधिवेशनात काय साध्य होणार? असा प्रश्न उपस्थित केला. तर गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी राज्यपालांच्या अभिभाषणात गोव्यातील प्रदूषणकारी प्रस्थापित कोळसा प्रकल्पाबाबत एकही अक्षर का नाही? असा मुद्दा उपस्थित केला. त्यावर पुढील कामकाजात यावर चर्चा होऊ शकते, असे सभापतींनी सुचवले. या व्यतिरिक्त सभागृहासमोर काल काहीच काम नसल्याने बुधवारपर्यंत सभागृह स्थगित करण्यात आले. मंगळवारी प्रजासत्ताक दिन असल्याने कोणतेही कामकाज होणार नाही.