पणजी (गोवा) - महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी गोवा सरकारच्या १० वीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याच्या धोरणावर आक्षेप घेतला आहे. सरकारचा हा निर्णय धक्कादायक असून यामुळे हुशार मुलांचे नुकसान होणार असल्याचे म्हटले आहे. परीक्षा रद्द करण्यापेक्षा विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून परीक्षेसंदर्भात धोरण निश्चित करावे आणि १० वी आणि १२ वीच्या परीक्षा घेण्यात याव्या, अशी सूचना त्यांनी केली आहे.
'१० आणि १४ वर्षावरील विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे'
अन्य देशांमध्ये १० आणि १४ वर्षावरील विद्यार्थ्यांना लसीकरण करायला सुरवात करण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री व डब्ल्यूएचओच्या लक्षात आणून द्यावी आणि गोव्यातील १० आणि १४ वर्षावरील विद्यार्थ्यांना लसीकरण करून देण्याची सूचना त्यांनी केली.
येत्या २५ जुलै पर्यंत परीक्षा पूर्ण कराव्या -
आमदार सुदिन ढवळीकर म्हणाले कि, गोव्यात १० वी आणि १२ वी ला जास्तीत-जास्त २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे अत्यंत सोपे आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून तात्काळ ५ जूनपर्यंत या विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याचा निर्णय घ्यावा. साधारण २० हजार डोस लागतील. पहिला डोस दिल्यानंतर १ महिन्यांनी १० वी आणि १२ वीची परीक्षा घेतली जावी. या परीक्षा येत्या २५ जुलै पर्यंत पूर्ण कराव्यात. या परीक्षा घेतल्या नाहीत तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला तर हा देशात ऐतिहासिक निर्णय होईल, असेही ते म्हणाले.
१० वीच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री सावंत काय म्हणाले?
गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षण मंडळ, राज्य शिक्षण विभाग, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ यांच्या समितीने केलेल्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आला. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षेच्या अंतर्गत मूल्यांकनानुसार दहावीचे गुण दिले जातील, असेही सावंत म्हणाले.