पणजी - 'संजीवनी' हा गोव्यातील एकमेव साखर कारखाना असून, यावर सुमारे तेराशेहून अधिक कुटुंब अवलंबून आहेत. सध्या कारखाना सुरू राहणार की बंद होणार ही संभ्रमावस्था असतानाच राज्याचे सहकार मंत्री व कृषीमंत्री विरोधाभासी वक्तव्य करत आहेत. यामुळे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी संबंधित विषयावरील सरकारची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.
सांतईनेज-पणजी येथील पक्षाच्या कार्यलायात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात हा कारखाना कृषी खात्याकडे सुपूर्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. राज्यासह देशातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट असून, कारखान्याचा गाळप हंगाम सुरू होणार की नाही, याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली.
गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी नकती मधील दोन इस्पितळे खासगी भागीदारीतून चालवण्याची घोषणा केली आहे. याबद्दल आपल्या पक्षाची भूमिका काय, असे विचारल्यावर, 'तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सरकारमध्ये असतानाही पर्रीकर आणि आम्ही या निर्णयाला विरोध केला होता. अत्ताही आमचा या पद्धतीच्या इस्पितळ उभारणीला विरोध आहे. परंतु, विद्यमान आरोग्य मंत्र्यांना इस्पितळासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असावे', असे ढवळीकर यांनी सांगितले.
गोवा सरकारने विशेष आर्थिक क्षेत्र आणि दोनापावला येथील आयटी पार्क संबंधी महिती देण्यासाठी श्वेतपत्रिका काढावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.