पणजी - गोव्यातील कोणत्याही धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात 'घुमट' वाद्याला मानाचे स्थान आहे. त्यामुळे त्याला शुक्रवारी गोवा मंत्रीमंडळाने 'हेरिटेज' वाद्य म्हणून या वाद्याला मान्यता दिली आहे. दोन्ही बाजूला निमुळते आणि मध्येच गोलाकार असलेले हे वाद्य एका बाजूला घोरपडीचे चामडे लावून बंद केले जाते. वन कायद्याची कडक अंमलबजावणी होऊ लागल्याने याला घोरपडी ऐवजी बकरीचे चामडे लावले जाते. गणोशोत्सवात आरती इतर सणासुदीच्या काळात या संगीतवाद्याला मानाचे स्थान आहे.
मंत्रीमंडळ निर्णयाबद्दल बोलताना गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी समाधान व्यक्त केले आहे. ते म्हणाले, गोव्याच्या धार्मिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या या वाद्याला 'हेरिटेज' वाद्याचा दर्जा द्यावा यासाठी मागील वर्षभर प्रयत्न करत होतो. गणेश चतुर्थी सणाच्या पूर्व संध्येला घुमटाला पारंपरिक वाद्याचा दर्जा देताना आनंद होत आहे. संपूर्ण गोव्यात घुमटा वरूनच आरतीचा गाज मोठा होत असतो. यासाठी येथील जनतेचेही आभार. कारण त्यांनी परंपरागत या वाद्याचे जतन केले आहे.
घुमट या वाद्यासाठी घोरपडी ऐवजी बकरीचे कातडे वापरण्यास परवानगी आहे, असे सांगून गावडे म्हणाले की याचा अर्थ घोरपडीचे कातडे असलेले घुमट जप्त केले जाणार असा नाही. कारण काहींजवळील घुमट 15 ते 20 वर्षे जूनी आहेत. या वाद्याला घोरपडीचे चामडे हे पूर्वापार आदिवासी लोकांकडून वापरले जाते. दरम्यान, आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत आदिवासी विकास योजने अंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामांची रखडलेली कामाची रक्कम देण्याला मान्यता मिळाली आहे, असेही गावडे यांनी सांगितले.