पणजी - सभापती हा सर्वांसाठी सारखाच असतो. त्या पदावरून सभागृहात अथवा बाहेर प्रश्न उपस्थित करता येत नाहीत. माध्यमांसमोर भूमिकाही मांडू शकत नाही, की गोमंतकीयांचे प्रश्न विचारू शकत नाही. त्यामुळे या पदासाठी मी इच्छुक नाही, असे मत उपसभापती तथा हंगामी सभापती मायकल लोबो यांनी आज व्यक्त केले. गोवा सरकारच्या वतीने सभापती निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यावर त्यांना विचारणा केली असता, त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
१७ मार्च ला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन झाल्यानंतर सभापतीपदावरून डॉ. प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. तेव्हापासून हे पद रिकामी आहे. त्याचा ताबा उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे देण्यात आला आहे. सरकारने बहुमत ठरावही मंजूर केला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी गोवा सरकारने पणजी पोटनिवडणूक जाहीर केली. १९ मे रोजी होत असून दुसऱ्या दिवशी (दि.२० मे) नवीन सभापती निवड करण्यासाठी हालचाल करत असल्याचा आरोप बुधवारी काँग्रेसने केला होता. यासंदर्भात लोबो यांच्याशी संवाद साधत ते या पदासाठी इच्छुक आहेत का? असे विचारले असता, ते बोलत होते.
लोबो म्हणाले, सरकार अशा प्रकारची हालचाल करत असल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी अद्याप काही सांगितलेले नाही. शिवाय २३ मे ला पोटनिवडणुकीचा निकाल येणार आहे. त्यामुळे पूर्ण २० ही सदस्य सभागृहात असतील. सभापती निवड प्रक्रियेत सहभाग हा प्रत्येक सदस्याचा अधिक आहे. मात्र, मी या पदासाठी इच्छुक नाही.
तसेच सभापती हे सर्वांसाठी समान असतात. सभापती बनून सभागृहात अथवा बाहेर गोमंतकियांचे प्रश्न उपस्थित करू शकत नाही, की दुरुस्ती सूचवू शकत नाही. तसेच माध्यमांसमोर भूमिका मांडू शकत नाही, असे पद मला नकोय. यासाठी जे निवृत्तीच्या जवळ आले आहेत, अशा एखाद्या सदस्याची यासाठी निवड करणे योग्य ठरेल. त्यांच्याजवळ अनुभवही असतो, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
मला मुख्यमंत्री व्हायचेय-
जर पक्षाने यासाठी सक्ती केली तर काय कारण असे विचारले असता, लोबो म्हणाले माझ्या मनात मुख्यमंत्री व्हावे असे आहे. परंतु, पक्षाने तसे केलेले नाही. जर सभापतीपदासाठी सक्ती केली तरीही तयार होणार नाही. उपसभापतीपदावर मी समाधानी आहे. निदान गोमंतकियांचे प्रश्न उपस्थित करू शकतो. कारण सदस्य प्रश्न उपस्थित करू शकतात सभापती नाही.