पणजी - पणजी पोटनिवडणुकीसाठी रविवारी 19 मे रोजी मतदान होत असून याची संपूर्ण तयारी झाली आहे. 30 केंद्रावर मतदान होणार आहे. यातील दोन केंद्रे संवेदनशील असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मतदारसंघातील 13 पैकी 7 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी मेनका म्हणाल्या की, पणजीत २२ हजार ४८२ मतदार आहेत. यामध्ये १० हजार ६९७ पुरुष आणि ११ हजार ७८५ महिला मतदार आहेत. तर १५० दिव्यांग मतदार आहेत. मतदान शांततेत आणि खुल्या वातावरणात पार पडावे, यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या काळात ६ ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. तसेच उमेदवारांनी सुरक्षेचे कारण उपस्थित केल्यामुळे जमावबंदी लागू करण्यात आली असून मतदान केंद्र परिसरात ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.
जिल्हाधिकारी मेनका पुढे म्हणाल्या, लोकसभेची निवडून नुकतीच झाली आहे. त्यामुळे ज्यांनी मतदान केले त्यातील काहींच्या बोटाला शाई आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विशेष परवानगी घेण्यात आली असून मतदाराच्या डाव्या हाताच्या रिंग फिंगरला शाई लावली जाणार आहे. तसेच दिव्यांगासाठी एक विशेष मतदान केंद्र तयार करण्यात आले असून त्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्व मतदान केंद्रांवर जिल्हा निवडणूक कार्यालयातून ऑनलाइन देखरेख ठेवली जाणार आहे. तर मतदान यंत्रे थेट स्ट्राँगरूममध्ये जमा केली जाणार आहेत. दरम्यान, आज दुपारी बांबोळी येथून ईव्हीएम घेऊन मतदान केंद्र अधिकारी रवाना करण्यात आले आहेत.