पणजी - लोकसभा निवडणुकीच्या सातव्या अर्थातच अखेरच्या टप्प्यात आज 59 जागांसाठी मतदान होत आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड या राज्यांसह चंडीगड येथे अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याच बरोबर पणजी (गोवा) एका विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठीही पोटनिवडणूक होत आहे. येथे मतदानालाही सुरुवात झाली आहे. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी रायबंदर येथील मतदान केंद्रावर मतदान केले आहे.
या निवडणुकीत 6 उमेदवार रिंगणात याहेत. निवडणूकीसाठी 30 मतदान केंद्र सज्ज झाली आहेत. यावेळी 22 हजार 419 मतदार या मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावतील. यापैकी 10 हजार 673 पुरुष तर 11 हजार 746 महिला मतदार या मतदारसंघात आहेत. मतदानासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून सीआरपी, केंद्रीय राखीव दल आणि राज्य पोलिसांच्या तुकड्या तैनात केल्या आहेत.
या ठिकाणी भाजप उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येकर आणि गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांनी मतदान केंद्र क्रमांक 21 आणि 9 या केंद्रांवर सकाळी मतदानाचा हक्क बजावला. तर काँग्रेस उमेदवार बाबूश मोन्सेरात आणि आपचे वाल्मिकी नाईक यांची नावे ताळगाव मतदारसंघात आहेत.
- संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 75.28 टक्के मतदान
- सकाळी 11 वाजेपर्यंत 31.38 टक्के मतदान
- पणजी केंद्र क्रमांक 9 येथे व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याने या ठिकाणी अर्धा तास मतदान बंद होते. त्यानंतर या ठिकाणी व्हीव्हीपॅट बदलल्यानंतर अर्ध्या तासाने मतदान सुरु झाले आहे.
- सकाळी 9 वाजेपर्यंत 14.36 टक्के मतदान