पणजी - भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (बुधवार) संध्याकाळी गोव्यात जाहीर सभा घेणार आहेत. यासाठी प्रदेश भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभेसाठी मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गोव्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. तर गोवा विधानसभेच्या तीन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या सर्वांसाठी पंतप्रधान एकच सभा घेत आहेत. ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये संध्याकाळी ५ वाजता सभा होणार आहे. यासाठी गोवा भाजपने जय्यत तयारी केली असून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोमवारी उशिरा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यांनी कार्यकर्त्यांसह सभास्थळाची पाहणी केली.
या सभेसाठी स्टेडियममध्ये १५ हजार तर बाहेर १० हजार लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे. यासाठी स्टेडियमबाहेर मंडप घालण्यात आला असून स्क्रीन लावण्यात येणार आहे. गोव्यातील खाण व्यवसाय बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. त्यामुळे आजच्या सभेत पंतप्रधान खाण, सीआरझेड, पर्यटन, विशेष राज्य दर्जा याविषयी काय बोलतात याची विरोधकांसह सर्वांनाच उत्सुकता आहे.