पणजी - नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या सुवर्ण महोत्सवी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) नवोदित चित्रपट निर्मिती आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी 'मिनी मुव्ही मॅनिया स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा गोवा आणि राष्ट्रीय अशा दोन स्तरावर होणार आहे, अशी माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी दिली.
हेही वाचा - ...अन्यथा गोव्याची बाजू पडणार लंगडी - राजेंद्र केरकर
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेसाठी इएसजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतीजा, ज्ञानेश मोघे आणि आदित्य जांभळे उपस्थित होते. या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे अनावरण यावेळी उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना फळदेसाई म्हणाले, चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी इच्छुक असलेल्या स्थानिक आणि नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत एक हजार रुपयांच्या डीडीसह प्रत्यक्ष कार्यालयात नोंदणी करावी लागेल. तर चित्रपटासाठीचा विषय 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता ऑनलाईन घोषित करण्यात येईल. त्यानंतर स्पर्धकाला पुढील 72 तासात चित्रपट तयार करून सादर करावा लागेल.
हेही वाचा - 'अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्याचा विषय कधीच ठरला नव्हता.. त्यांना तर पाच वर्षे हवे असेही वाटेल'
विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जातील. यामध्ये गोवा विभागात उत्कृष्ट दिग्दर्शक विजेत्याला 1 लाख तर उपविजेत्याला 50 हजार रुपये रोख. त्याशिवाय अन्य 9 वेगवेगळ्या विभागात बक्षिसे दिली जातील. तर राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट दिग्दर्शकाला रोख रुपये 1 लाख आणि अन्य 9 बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन गोवा मनोरंजन संस्थेचे असून लवकरच परीक्षकांची निवड करण्यात येईल, असेही फळदेसाई यांनी सांगितले.
आतापर्यंत 5959 प्रतिनिधी नोंदणी-
20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणाऱ्या इफ्फीसाठी आतापर्यंत 5959 प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. यापैकी 2795 जणांनी प्रवेश शुल्क जमा केले आहे. तसेच 972 विद्यार्थी प्रतिनिधी आहेत, अशी माहिती इएसजी सीईओ अमित सतीजा यांनी दिली. तसेच ते म्हणाले, यावेळी आयनॉक्स पर्वरी येथील तीन स्क्रीन इफ्फीसाठी वापरल्या जाणार आहेत. तसेच कला अकादमीबाबत प्रक्रिया सुरू आहे. कांपाल मैदानावर 'स्टेट फिल्म प्रमोशन झोन' असेल जेथे देशभरातील विविध चित्रपट निर्मितीशी संबंधित व्यक्ती सहभाग घेतील. तसेच चित्रीकरणासाठी योग्य विविध ठिकाणांचे प्रदर्शन असेल. त्याबरोबर ओपन एअर स्क्रीनिंग तसेच तालुका स्तर आणि रवींद्र भवनमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार संस्थेच्या विचाराधीन आहे.